Atul Subhash Sucide Case : गेल्या आठवड्यात बंगळुरूतील तंत्रज्ञ अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरचे लोक छळत असल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. अतुल यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ आणि २४ पानांचे पत्र लिहित पत्नी निकिता आणि तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर बंगळुरू पोलिसांनी अतुल सुभाष यांच्या पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा अनुराग सिंघानिया यांना अटक केली आहे.
भाड्याची खोली
दरम्यान निकाताबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ लागले आहेत. अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी पत्नी निकिताने गुरुग्राममध्ये एक खोली भाड्याने घेतली होती. निकिताने तेथे तिचे सामान नेऊन ठेवले होते पण ती राहायला गेलेली नव्हती. निकिताने ८ डिसेंबर रोजी एका महिन्याचे भाडेही दिले होते. असे असले तरी निकिताने याबाबत कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. यासाठी घरमालकाने तिला सातत्याने फोन केल्यानंतरही तिने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. याबाबत टाईम्स नाऊने वृत्त दिले आहे.
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
अतुल यांची पत्नी, सासू आणि मेहुण्याला अटक केल्यानंतर बंगळुरूतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. निकिताला गुरुग्राममधील हाँगकाँग बाजार रस्त्यावरील एका घरातून अटक करण्यात आली. तर, निशा आणि अनुराग सिंघानिया यांना अलाहबाद जिल्ह्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली.
पत्नीचे दावे
बंगळुरू पोलिसांनी अतुल सुभाष यांची पत्नी निकिताची चौकशी सुरू केली आहे. यावेळी निकिताने दावा केला की, तिने अतुल यांना कोणताही त्रास दिलेला नाही. उलट पतीनेच आपल्याला छळल्याचे आरोपी पत्नीचा दावा आहे. यावेळी निकिताने ती तीन वर्षांपासून वेगळे राहत असल्याचे सांगितेल. यावेळी ती असेही म्हणाली की, “जर पतीची पैशासाठी छळवणूक करायची असती तर मी त्यांच्यापासून दूर का राहिली असते.”
हे ही वाचा : “…मग निवडणुका लढवू नका”, ओमर अब्दुल्लांचा ईव्हीएमवरून काँग्रेस व ‘इंडिया’तील मित्रपक्…
अतुल सुभाष यांचे आरोप
बंगळुरूतील एका खासगी कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या ३४ वर्षीय अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून ९ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ८१ मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून २४ पानांचे पत्रही लिहिले आहे. या पत्रामध्ये अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.