एअर इंडियाच्या विमानाचं त्रिची विमानतळावर आपात्कालीन लॅंडिंग करण्यात आलं आहे. हे विमान त्रिचीवरून शारजाहकडे जात होतं. शुक्रवारी सायंकाळी एअर इंडियाच्या विमानाने त्रिची विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं. मात्र, उड्डाण घेताच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं पायलटच्या निर्देशनास आलं. त्यामुळे हे विमान जवळपास दोन तास आकाशात घिरट्या घालत होते. अखेर काही वेळाने या विमानाला सुखरूप उतरवण्यात यश आले.

हेही वाचा – Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. महत्त्वाचे म्हणजे या विमानात जवळपास १४० प्रवासी प्रवास करत होते. त्रिची विमानतळाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानामधील हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यामुळे या विमानाचे लॅंडिंग करण्यात आलं. महत्त्वाचे म्हणजे या घटनेमुळे त्रिची विमानतळावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. संभाव्य धोका लक्षात घेऊन विमानतळावर अग्निशमन दलाच्या गाड्याही बोलवण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – Jonty Rhodes : जॉन्टी ऱ्होड्सने नाराजी व्यक्त केल्यानंतर एअर इंडियाने मागितली माफी, नेमकं काय आहे प्रकण?

दरम्यान, या घटनेनंतर एअर इंडियाच्यावतीनेही यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यात आली. त्रिचीवरून शारजाहकडे जाणारे एअर इंडियाच्या विमानातील हायड्रॉलिक सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या विमानचे लॅंडिंग करण्यात आलं. यावेळी विमानामध्ये इंधनाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने वजन कमी करण्याच्या हेतून ते थोडा वेळ आकाश फिरत होते. मात्र, काही मिनिटांतच या विमानाचे सुरक्षित लॅंडिंग करण्यात आलं. आम्ही या घटनेचा तपास करतो आहे, असं एअर इंडियाच्यावतीने सांगण्यात आलं.