TED Talks Chief Slams Elon Musk : टेस्ला आणि एक्सचे प्रमुख एलॉन मस्क सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतात. गेल्या काही काळात ते सोशल मीडियावरही आक्रमकपणे व्यक्त होत आहेत. अशात Ted Talks चे प्रमुख ख्रिस अँडरसन यांनी एलॉन मस्क यांना एक खुले पत्र लिहिले आहे, ज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मस्क यांच्या पोस्ट्सवर प्रकाश टाकला आहे. यावेळी अँडरसन यांनी काही उदाहरणे देत मस्क यांच्या काही पोस्ट्स “एखाद्याचा जीव घेऊ शकतात”, असे म्हटले आहे. यावेळी अँडरसन यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये पत्रकारितेच्या गाभा आणि एलॉन मस्क यांच्या लिखाणातील जोखीमीवर भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एलॉन मस्क यांच्यासाठी एक्सवर पोस्ट करताना सुरुवातीलाच ख्रिस अँडरसन म्हणाले, “इलॉन मस्क यांना हे खुले पत्र मी घाबरत-घाबरतच लिहिले आहे. पूर्वी मी ज्या मस्क यांचे कौतुक केले होते, त्यांची आता मला काळजी वाटत आहे. मला माहित आहे की, अशा प्रकारचा विचार करणारा मी एकटा नाही. जर कोणाला वाटले तर कृपया ही पोस्ट लाईक आणि रिपोस्ट करा. एलॉन, हे लक्षात घ्या की, मी हे पत्र चांगल्या भावनेने लिहिले आहे.”

शतकातील सर्वात प्रभावशाली लेखक

ख्रिस अँडरसन यांनी या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील कामगिरीच्या बरोबरीने, तुम्ही या शतकातील सर्वात प्रभावशाली लेखक बनला आहात. तुमचे स्वतःचे नियंत्रित असलेल्या प्लॅटफॉर्मवर (एक्स) तुमचे २०० दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. आणि तुम्ही जे लिहिता ते फक्त त्या फॉलोअर्सपर्यंतच नाही तर, त्यापलिकडे प्रत्येक प्रसार माध्यम त्याला प्रसिद्धी देते.”

इतके सामर्थ्य इतिहासात कोणाकडेही नव्हते

“तुम्ही ट्विटर विकत घेऊन एक मोठा जुगार खेळला आहात आणि आता त्याचा तुम्हाला फायदा होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. तुम्ही सरकार बलण्यासह, जगावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकण्यासाठी त्याचा वापर करू शकता असे दिसते. तुम्ही पोस्ट केलेली प्रत्येक गोष्ट लाखो लाईक्स आणि रीपोस्ट मिळवते. हृदयाच्या ठोका पडण्याआधी तुम्ही जागतिक संभाषण बदलू शकता. इतके सामर्थ्य इतिहासात कोणाकडेही नव्हते”, असेही ख्रिस अँडरसन यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

हे ही वाचा : ISRO New Chairman : डॉ. व्ही. नारायणन इस्रोचे नवे प्रमुख, १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार

तुमच्या पोस्टमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो

ख्रिस अँडरसन यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटले की, “मला पत्रकारितेची खूप काळजी वाटते. मी पत्रकार म्हणून माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली कारण चांगल्या लोकशाहीसाठी चांगली पत्रकारिता आवश्यक आहे, यावर माझा विश्वास होता. आज मी चिंतेत आहे, खरं तर खूप चिंतेत आहे. कारण जागतिक संभाषणावर कब्जा करताना, तुम्ही पत्रकारितेचे काही मूलभूत सिद्धांत विसरले आहात. जेव्हा तुम्ही कोट्यवधी लोकांसमोर म्हणता की, मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांबद्दल एखाद्याला फाशी दिली पाहिजे किंवा तुरुंगात टाकले पाहिजे. त्यावेळी तुम्ही दुसरी बाजूही मांडत जा. तुमच्या अलीकडील पोस्ट्समुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. तुम्हाला खरोखरच हा धोका पत्करायचा आहे का? एलॉन, तुम्ही स्वतः जे पोस्ट करता ते विचारपूर्वक संपादित करत जावा.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ted talks chief warns elon musk your posts can have deadly consequences aam