गुजरातच्या वलसाड येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एक २२ वर्षीय तरुणी तिचा चार महिन्यांचा मुलगा आणि अल्पवयीन प्रियकराबरोबर राहत होती. मात्र अल्पवयीन प्रियकराने तान्ह्या मुलाचा खून करून उत्तर प्रदेशला पळ काढला. शनिवारी वलसाड पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वलसाडच्या उमरगाव येथे सदर अल्पवयीन मुलगा त्याच्या प्रेयसीबरोबर राहत होता. चार महिन्यांचा खून केल्यानंतर त्याने प्रयागराजला पळ काढला होता.

प्रकरण कधी घडले?

१३ जानेवारी रोजी तरुणी आपल्या तान्ह्या मुलाला घरी ठेवून बाजारात गेली होती. यावेळी अल्पवयीन प्रियकराला तिने बाळाची काळजी घेण्यास सांगितले होते. मात्र ती जेव्हा परतली तेव्हा बाळाचा मृत्यू झाला होता. अल्पवयीन प्रियकराने सांगितले की, बाळ जमिनीवर पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. यानंतर दोघांनी मिळून बाळाला पुरले.

दुसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलाने तिथून पळ काढला. त्यामुळे प्रेयसीने त्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी ज्या ठिकाणी बाळ पुरले होते, त्याची तपासणी केली. तसेच बाळाचा मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला, असे वलसाडचे पोलीस अधीक्षक करणराज वाघेला यांनी सांगितले.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान अल्पवयीन आरोपीने सांगितले की, तो आणि त्याची प्रेयसी हरियाणाच्या गुरुग्राम येथून पळाले होते. आधी ते महाराष्ट्रातील ठाणे शहरात आले. इथेच प्रेयसीला मुलगा झाला. यानंतर दोघे वलसाडच्या उमरगाम येथे आले. मृत बाळ तरुणीच्या आधीच्या प्रियकराचे होते, अशीही माहिती तपासात पुढे आली.

म्हणून बाळाचा खून केला

प्रेयसी दिवसातला बराच वेळ घराबाहेर घालवत होती. अशावेळी अल्पवयीन आरोपीला बाळाचा सांभाळ करावा लागत होता. हा आपला मुलगा नाही तरी याचा आपल्याला सांभाळ करावा लागतोय, या विचारातून अल्पवयीन आरोपीने बाळाचा खून केला. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यानंतर त्याला रितसर अटक करण्यात आली. तसेच पोलीस अल्पवयीन आरोपीचे योग्य वयही तपासत आहेत.

Story img Loader