उत्तर प्रदेशातील कनौजमध्ये सरकारी विश्रामगृहाजवळ १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. ही मुलगी जखमांनी विव्हळत असताना बघ्यांनी तिचा व्हिडीओ काढला, मात्र त्यातील एकानेही तिला मदतीचा हात दिला नाही. ही संतापजनक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
धक्कादायक! युगांडामध्ये दृष्टिहीन मुलांच्या शाळेला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू
ही मुलगी एका व्यक्तीसोबत सरकारी विश्रामगृह परिसरात येत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. यानंतर काही तासांतच ती बेशुद्ध आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली आहे. या घटनेतील एका व्हिडीओत वेदनेनं व्याकुळ मुलगी मदतीसाठी याचना करतेय. मात्र, उपस्थितांपैकी एकही व्यक्ती पीडितेच्या मदतीसाठी पुढे सरसावताना दिसत नाही.
रविवारी दुपारी पीडित मुलगी पिगी बँक दुकानातून बदलवून घेण्यासाठी घरातून निघाली होती. त्यानंतर तब्बल पाच तास ती घरी परतली नसल्याचं पीडितेच्या काकांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर ही मुलगी विश्रामगृहाशेजारील झुडुपांमध्ये जखमी अवस्थेत एका सुरक्षारक्षकाला आढळून आली. या सुरक्षारक्षकाने माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आलं. पीडितेच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा आहेत. तिच्या डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. पीडितेचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. सीसीटीव्हीत आढळून आलेल्या संशयित व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.