१३ वर्षांच्या एका मुलीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. तसंच तिला विवस्त्र करुन तिच्या अंगावर कुत्राही चावण्यासाठी सोडण्यात आला. एवढंच नाही तर तिला हातोडीनेही मारहाण करण्याची घटना घडली आहे. ही घटना दिल्लीतजवळच्या गुरुग्राममध्ये घडली आहे. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपींविरोधात तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ वर्षांच्या एका मुलीला गुरुग्रामच्या क्यूबर सिटीच्या सेक्टर ५७ मध्ये एका घरात काम करत होती. तिला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्याचं म्हटलं आहे.
पीडित मुलीच्या आईने काय सांगितलं?
पीडितेच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ज्या घरात मुलगी काम करत होती तिथल्या महिलेने याआधीही मुलीला लोखंडी रॉडने मारहाण केली होती. तसंच या महिलेची दोन मुलं तिच्या मुलीला विवस्त्र करत असत. तिचा व्हिडीओ तयार करत आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असा आरोप आता पीडितेच्या आईने केला आहे. गुरुग्रामच्या महिलेने या मुलीला विवस्त्र व्हिडीओ तयार केला होता. तसंच तिला धमकी दिली की तू आमचं ऐकलं नाहीस तर आम्ही तुला वेश्या व्यवसाय करायला लावू असंही या मुलीच्या आईने पोलिसांना सांगितलं आहे. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
रविवारी या १३ वर्षांच्या मुलीला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं होतं. तिच्या आईने तिला सोडवलं. या मुलीची आई जेव्हा महिलेच्या घरी गेली तेव्हा या मुलीला कोंडलं गेलं होतं. तिच्या तोंडावर पट्टी लावली होती. ४८ तासांमध्ये तिला फक्त एकदा जेवण दिलं गेलं होतं.
पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच इतर कलमांन्वयेही गुन्हा दाखल केला आहे.