गुजरातच्या सुरतमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने घरीच गर्भपात करून तिचं भ्रूण एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकलं. या ढिगाऱ्यावर असंख्य पक्षी घिरट्या घालत होते. या पक्षांना दूर लोटण्याकरता स्थानिक लहान मुलांनी दगडफेक केल्यानंतर त्यांना तिथे भ्रूण असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तत्काळी यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. एनडटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी या भ्रूणाला सिव्हिल रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिथे मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांनी या भ्रूणाच्या आईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अथक शोध घेतल्यानंतर ते १६ वर्षीय मुलीपर्यंत पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी तिच्या आईची चौकशी केली असता त्यांनी ही बाब फेटाळून लावली. मात्र, पोलिसांनी त्यांची चौकशी सुरूच ठेवली. त्यानुसार त्यांनी या अल्पवयीन मुलीला सिव्हिल रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरता नेले असता तिथे डॉक्टरांनी ती गर्भवती होती, असा दाखला दिला. अखेर या मुलीने सर्व हकिगत पोलिसांना सांगितली.
पोलिसांना तपासातून काय आढळलं?
संबंधित मुलगी सूरत येथील अपेक्षानगर येथील आहे. तिची इन्स्टाग्रामवरून एका १७ वर्षीय मुलाशी भेट झाली. त्यांच्यात मैत्रीही झाली. हा मुलगा सूरतमधील पांडसेरा येथील औद्योगिक परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. त्यांच्यात शारिरीक संबंध होते, त्यामुळे ती गरोदर राहिली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मुलगी गरोदर असल्याचे समजल्यानंतर तो मुलगा उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी आणि नंतर मुंबईला पळून गेला, असंही पोलीस म्हणाले. “मुंबईहून मुलाने तिला गर्भधारणा संपवण्यासाठी गोळ्यांचे पॅकेट पाठवले. तिने दोन गोळ्या घेतल्या आणि घरीच तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिने गर्भ फेकून दिला”, असे पोलिस अधिकाऱ्याने मुलीच्या हवाल्याने सांगितले.
“आम्ही त्यांचे (मुलगा आणि मुलगी) डीएनए नमुने घेतले आहेत आणि तपास सुरू आहे”, अधिकारी म्हणाला. संबंधित मुलगी ३ जानेवारीपर्यंत शाळेतही गेली होती. आणि हा प्रकार ९ जानेवारी रोजी उजेडात आला. दरम्यान, मुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.