Jodhpur gangraped news: जोधपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (२५ ऑगस्ट) जोधपूरच्या महात्मा गांधी शासकीय रुग्णालय परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी आता दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांची माहिती अद्याप उघड केलेली नाही. दोघेही जण रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर सफाई कर्मचारी म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कोलकातामध्ये आर.जी. कार रुग्णालयात डॉक्टर तरूणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशात नाराजीचे वातावरण असतानाच ठिकठिकाणी अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत.
बलात्काराच्या घटनांमुळे शहर हादरल्यानंतर आता विरोधकांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. राजस्थानमध्ये जंगल राज सुरू असल्याची टीका काँग्रेसने केली.
आईबरोबर भांडण करून अल्पवयीन मुलगी बाहेर पडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आईशी भांडण झाल्यानंतर तिने रागातून घर सोडले होते. त्यानंतर रविवारी दुपारी ती रुग्णालयाच्या कँटिनमध्ये गेली होती. सायंकाळपर्यंत मुलगी घरी न परतल्यामुळे पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान कँटिनमध्ये मुलगी एकटी असल्याचे हेरून दोघाजणांनी तिचा विश्वास संपादन करून तिला रुग्णालयाच्या मागील डम्पिंग यार्डमध्ये नेले. तिथे पीडितेवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर दोघाही जणांनी तिथून पळ काढला. यानंतर पीडित मुलीने तिथून पळ काढल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.
प्रताप नगकरचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कुमार माध्यमांना माहिती देताना म्हणाले की, मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार रविवारी नोंदविली होती. सोमवारी आम्हाला तिच्यावर अत्याचार झाल्याचे समजले. घटनास्थळावरून न्यायवैद्यक शास्त्र पथकाद्वारे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. सध्या आमचा तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणी आणखी माहिती समोर आणू.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत या घटनेनंतर म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर रुग्णालय परिसरात झालेला सामूहिक बलात्कार हा राजस्थानमधील जंगल राजचा पुरावा आहे. जोधपूरचे लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांना कायदा व सुव्यवस्थेशी काही देणेघेणे नाही. त्यामुळेच आरोपी मोकाट सुटलेले आहेत.