पीडितेशी संपर्क साधण्यात गोवा पोलिसांना यश; पीडित महिलेकडून दोन दिवसांपूर्वीच ‘तहलका’चा राजीनामा
गोवा येथे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात महिला सहकारी पत्रकाराचा विनयभंग केल्याच्या कथित प्रकरणी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला आहे.  न्या. जी.एस.सिस्टानी यांच्यापुढे ही याचिका तेजपाल यांच्यावतीने अ‍ॅड. संदीप कपूर यांनी सादर केली, त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गोवा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्याकरिता वेळ मिळावा यासाठी आपल्याला ट्रान्सिट अटक जामीन द्यावा, अशी विनंतीही त्यांनी याचिकेत केली आहे.
दरम्यान पीडित महिलेशी पोलिसांनी संपर्क साधला असल्याची माहिती गोव्याचे पोलिस उपमहानिरीक्षक ओ.पी.मिश्रा यांनी दिली. या महिलेने दोनच दिवसांपूर्वी तहलका नियतकालिकाचा राजीनामा दिला असल्याचे समजते. गोवा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना महिनाभरापूर्वी घडली होती. गोवा पोलिसांनी २२ नोव्हेंबरला तेजपाल यांच्यावर कलम ३७६ (बलात्कार). कलम ३७६ (२) के (ताब्यातील महिलेवर अधिकारपदाचा गैरवापर करून बलात्कार) व ३५४ (विनयभंग) असे आरोप प्राथमिक माहिती अहवालात ठेवले आहेत. यात जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. १९ नोव्हेंबरला सदर महिलेने आपल्यावर तेजपाल यांनी लैंगिक हल्ला केल्याचा आरोप केल्याने हे प्रकरण उघडकीस आले होते, त्यानंतर तेजपाल यांनी सहा महिन्यांसाठी संपादक पदाचा राजीनामा दिला होता.
शनिवारी गोवा पोलिसांच्या एका पथकाने तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी व तीन कर्मचारी यांचे जाबजबाब घेतले होते. त्या वेळी एक हार्ड डिस्कही जप्त करण्यात आली होती.
तेजपाल यांनी महिला सहकारी पत्रकारावर लैंगिक हल्ला केल्याच्या प्रकरणी आपल्याला धक्का बसल्याचे ‘द इंडियन जर्नालिस्ट युनियन’ या संस्थेने म्हटले आहे. संस्थेचे अध्यक्ष एस.एन सिन्हा व सरचिटणीस डी.एमर यांनी सांगितले की, तहलका नियतकालिकाच्या संपादिका शोमा चौधरी यांनी पीडित महिलेला मदत करण्याऐवजी संपादक तेजपाल यांना वाचवण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने असे म्हटले आहे की, या पीडित महिलेला संरक्षण देण्याबाबत केलेल्या विनंतीबाबत आता मुंबई पोलिसांकडून प्रतिसाद अपेक्षित आहे. तेजपाल यांच्याकडून पीडित महिलेला धोका असल्याने आयोगाने ही विनंती केली होती. वृत्तसंस्थेने पीडित महिलेशी संपर्क साधला असता तिने सांगितले, की आपण तहलकाचा राजीनामा दिला आहे.
तिने तिचा राजीनामा दोनच दिवसांपूर्वी पाठवला असून ती तहलकाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहात होती. तहलकामधील सल्लागार संपादक जय मुजुमदार, सहायक संपादक रेवती लाल यांनीही यापूर्वीच राजीनामा दिला. तहलकाचे साहित्यविषयक संपादक शौगत दासगुप्ता यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. येत्या काही दिवसांत जास्तीत जास्त कर्मचारी राजीनामा देण्याची शक्यता आहे.

तेजपाल यांचे वर्तन अमानवी – पर्रिकर
पीडित महिलेच्या संमतीने हे कृत्य केल्याचा तेजपाल यांचा दावा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी फेटाळला आहे. ते म्हणाले की, ज्या अर्थी त्यांनी सहा महिन्यांसाठी का होईना राजीनामा दिला त्याअर्थी त्यांना आरोप मान्य आहेत. हा माणूस सहा महिन्यांसाठी संन्यास घेऊन परत येऊ इच्छितो याचे आश्चर्य वाटते. गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्यावर प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला असून त्यात तेजपाल यांच्यावर बलात्कार व सहाकारी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल दाखल करून पहिले कर्तव्य पार पाडले आहे. तेजपाल यांचे वर्तन हे अमानवी आहे. आपल्या देशात शिक्षणातील मूल्यपद्धत ढासळल्याचे ते लक्षण आहे. शिक्षणात काही दिवसांनी लोकांना रस वाटणार नाही कारण हे शिक्षण कुठली मूल्ये शिकवते? आपल्या मुलींना क्रीडा स्पर्धा किंवा इतर कारणांसाठी पुरूष शिक्षकांबरोबर परगावी पाठवताना आईवडिलांच्या मनात आताच्या स्थितीत काय विचार येत असतील याचा विचार करा, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader