पीडितेशी संपर्क साधण्यात गोवा पोलिसांना यश; पीडित महिलेकडून दोन दिवसांपूर्वीच ‘तहलका’चा राजीनामा
गोवा येथे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात महिला सहकारी पत्रकाराचा विनयभंग केल्याच्या कथित प्रकरणी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला आहे. न्या. जी.एस.सिस्टानी यांच्यापुढे ही याचिका तेजपाल यांच्यावतीने अॅड. संदीप कपूर यांनी सादर केली, त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गोवा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्याकरिता वेळ मिळावा यासाठी आपल्याला ट्रान्सिट अटक जामीन द्यावा, अशी विनंतीही त्यांनी याचिकेत केली आहे.
दरम्यान पीडित महिलेशी पोलिसांनी संपर्क साधला असल्याची माहिती गोव्याचे पोलिस उपमहानिरीक्षक ओ.पी.मिश्रा यांनी दिली. या महिलेने दोनच दिवसांपूर्वी तहलका नियतकालिकाचा राजीनामा दिला असल्याचे समजते. गोवा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना महिनाभरापूर्वी घडली होती. गोवा पोलिसांनी २२ नोव्हेंबरला तेजपाल यांच्यावर कलम ३७६ (बलात्कार). कलम ३७६ (२) के (ताब्यातील महिलेवर अधिकारपदाचा गैरवापर करून बलात्कार) व ३५४ (विनयभंग) असे आरोप प्राथमिक माहिती अहवालात ठेवले आहेत. यात जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. १९ नोव्हेंबरला सदर महिलेने आपल्यावर तेजपाल यांनी लैंगिक हल्ला केल्याचा आरोप केल्याने हे प्रकरण उघडकीस आले होते, त्यानंतर तेजपाल यांनी सहा महिन्यांसाठी संपादक पदाचा राजीनामा दिला होता.
शनिवारी गोवा पोलिसांच्या एका पथकाने तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी व तीन कर्मचारी यांचे जाबजबाब घेतले होते. त्या वेळी एक हार्ड डिस्कही जप्त करण्यात आली होती.
तेजपाल यांनी महिला सहकारी पत्रकारावर लैंगिक हल्ला केल्याच्या प्रकरणी आपल्याला धक्का बसल्याचे ‘द इंडियन जर्नालिस्ट युनियन’ या संस्थेने म्हटले आहे. संस्थेचे अध्यक्ष एस.एन सिन्हा व सरचिटणीस डी.एमर यांनी सांगितले की, तहलका नियतकालिकाच्या संपादिका शोमा चौधरी यांनी पीडित महिलेला मदत करण्याऐवजी संपादक तेजपाल यांना वाचवण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने असे म्हटले आहे की, या पीडित महिलेला संरक्षण देण्याबाबत केलेल्या विनंतीबाबत आता मुंबई पोलिसांकडून प्रतिसाद अपेक्षित आहे. तेजपाल यांच्याकडून पीडित महिलेला धोका असल्याने आयोगाने ही विनंती केली होती. वृत्तसंस्थेने पीडित महिलेशी संपर्क साधला असता तिने सांगितले, की आपण तहलकाचा राजीनामा दिला आहे.
तिने तिचा राजीनामा दोनच दिवसांपूर्वी पाठवला असून ती तहलकाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहात होती. तहलकामधील सल्लागार संपादक जय मुजुमदार, सहायक संपादक रेवती लाल यांनीही यापूर्वीच राजीनामा दिला. तहलकाचे साहित्यविषयक संपादक शौगत दासगुप्ता यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. येत्या काही दिवसांत जास्तीत जास्त कर्मचारी राजीनामा देण्याची शक्यता आहे.
तेजपाल यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
गोवा येथे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात महिला सहकारी पत्रकाराचा विनयभंग केल्याच्या कथित प्रकरणी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-11-2013 at 12:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tehelka case founder tarun tejpal applies for bail