‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर गोवा पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी समर्थन केले. तेजपाल यांच्यावर कारवाईसाठी गोव्यातील पोलीसांवर कोणताही राजकीय दबाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीसांनी याप्रकरणी कोणाच्याही दबावाचा विचार करू नये, असे अधिकाऱयांना सांगण्यात आल्याचे पर्रिकर म्हणाले. दरम्यान, तेजपाल यांच्या अटकपूर्व जामीनावरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारपर्यंत राखून ठेवला. शुक्रवारी निर्णय होईपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन देण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळली.
तेजपाल यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱया महिला पत्रकाराने बुधवारी आपला जबाब पणजीच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱयांसमोर नोंदविला. या खटल्याचा तपास करणाऱया अधिकारी सुनिता सावंत यांच्यासोबत पीडित महिला बुधवारी सकाळी मुंबईहून पणजीला दाखल झाली होती. भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १६४ नुसार पीडितेचा जबाब न्यायदंडाधिकाऱयांसमोर नोंदविण्यात आला.
गोवा पोलीसांनी तेजपाल यांना समन्स बजावला असून, त्यांना चौकशीसाठी पोलीसांपुढे हजर होण्यास सांगण्यात आले आहे. गोवा पोलीसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने ही माहिती दिली.
गोव्यामध्ये ‘थिंक फेस्ट’ कार्यक्रमात एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरूण तेजपाल यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार पीडितेने केली होती. यानंतर तेजपाल यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर संबंधित महिलेने आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, ‘तहलका’च्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी आपल्या पाठिशी उभ्या न राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

Story img Loader