तेहलका नियतकालिकाचे संस्थापक- संपादक तरुण तेलपाल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीने तेजपाल आणि तत्कालीन व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांच्यासोबतच्या दूरध्वनी संभाषणाची ध्वनिफीत गोवा पोलिसांना सादर केली आह़े  तरुण यांच्यावर आरोप केल्यानंतरची संभाषणे तरुणीने ध्वनिमुद्रित करून ठेवली होती़
बुधवारी पोलिसांकडून तेजपाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करण्यात आली़  त्या वेळी तरुणीकडून देण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण पुरावा पोलिसांनी न्यायालयात सादर केला़  या वेळी पोलिसांनी म्हटले की, तेजपाल यांना जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकणाऱ्या या ‘गंभीर आणि संवेदनशील’ गुन्ह्य़ाचे पुरावे गोळा करण्यासाठी हा अवधी आवश्यक आहे. त्यानंतर न्यायालयाने तेजपाल यांना १२ दिवसांची कोठडी दिली होती़
गेल्या महिन्यात गोव्यातील कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या घटनेनंतर या संदर्भात पीडित तरुणी, तरुण आणि शोमा यांच्यात मोबाइल संदेश, ई-मेलद्वारे झालेल्या संभाषणांची माहिती पोलिसांनी संकलित केली होती़  त्यासोबतच तरुणीने दिलेल्या संभाषणांच्या ध्वनिफिती आणि ग्रॅण्ड हयात हॉटेलमधील सीसीटीव्हींचे चित्रीकरण हे बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पुरावे ठरणार असल्याचेही पोलिसांनी सांगितल़े
तक्रारदार तरुणीने सीसीटीव्ही चित्रीकरणातील स्वत:ला आणि तेजपाल यांना ओळखले आहे, असे तपास अधिकारी सुनीता सावंत यांनी न्यायालयाला सांगितल़े
या वेळी तेजपाल यांचे वकील संदीप कपूर यांनी तेजपाल यांना स्वतंत्र कोठडीत ठेवण्याची न्यायालयाला विनंती केली़  इतर आरोपींसोबत त्यांना ठेवल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असे कारण त्यांनी दिल़े  व्यवहारीदृष्टय़ा शक्य असेल तर तेजपाल यांना स्वतंत्र ठेवण्याचे निर्देश या वेळी न्यायालयाने दिल़े; परंतु तुरुंगाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोठडय़ांतील कैद्यांची संख्या पाहता, ही मागणी पूर्ण करणे अशक्य आह़े

Story img Loader