तहेलका संस्थापक तरुण तेजपाल यांनी सहकारी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणाच्या चौकशी अंतर्गत गोवा पोलिसांनी संबंधित पंचतारांकित हॉटेलच्या ‘सीसीटीव्ही कॅमरेच्या टेप्स’ घेण्यासाठी हॉटेलवर जाऊन चौकशी केली. परंतु, त्या हॉटेलमध्ये ज्या लिफ्टमध्ये हा प्रकार घडला गेल्याचे समोर आले आहे. त्या लिफ्टमध्ये कॅमेराच नाही.
गोव्याचे पोलिस अधिक्षक मिश्रा म्हणाले की, “हॉटेल मालकाने दिलेल्या माहितीनुसार त्या हॉटेलच्या लिफ्टमध्ये कॅमेराच लावण्यात आलेला नाही. तरीसुद्धा हॉटेलमधील इतर कॅमेरांच्या फुटेजेस् ची आम्ही तपासणी करत आहोत.”
तसेच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांचे एक विशेष पथक दिल्लीत दाखल झाले आहे. हे पथक तहेलका संस्थापक तरुण तेजपाल आणि व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांची चौकशी करणार आहे. त्याचबरोबर पीडित तरुणीचीही पोलीस भेट घेण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणासंबंधी  तहेलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांचीही या प्रकरणासंबंधी त्यांना असलेल्या माहितीची चौकशी करणार आहेत. त्याचबरोबर लवकरच पीडित तरुणीचा जबाबही नोंदविला जाणार आहे. गोवा पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी आणि काही इतर अधिकारी पुढील काही कारवाई करण्याआधी दिल्लीला शोमा चौधरी यांना या प्रकरणाबाबत चौकशी करणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयानेही गोवा सरकारकडे या सर्व प्रकरणाबाबतचा तपशील मागविला आहे.
गुन्ह्य़ातील व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याचे दडपण मनावर आणू न देता कायद्यानुसार योग्य तो तपास करा आणि कारवाई करा, असे आपण पोलिसांना स्पष्टपणे बजाविल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले. तेजपाल प्रकरणात काँग्रेसने सावध तर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असतानाच भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेसच्या हातात हात घातलेल्या संयुक्त जनता दलाने भाजपला अनुकूल भूमिका घेतली आहे.
संबंधित तरुणीची माफी मागून सहा महिन्यांसाठी पायउतार होऊन हे प्रकरण मिटविण्याचा तेजपाल यांचा प्रयत्न गुरुवारीच जसा फोल ठरला त्याचप्रमाणे त्यांची पाठराखण करू पाहणाऱ्या तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांची शुक्रवारी चांगलीच कोंडी झाली. ‘तेजपाल यांचीही बाजू आहे’, हे विधान शोमा चौधरी यांच्या चांगलेच अंगाशी आले. या सहकारी तरुणीने सोमवारी माझ्याकडे तक्रार केली. तेजपाल यांनी माफी मागावी, एवढीच तिची मागणी होती. त्यासाठी मी तेजपाल यांच्याशी जोरदार वादही घातला आणि त्यांना माफी मागायला लावली. त्यांनी माफी मागितली आणि सहा महिने ते पदावरून दूर झाले, ही शिक्षा पुरेशी आहे, असे सर्वच सहकाऱ्यांचे मत होते. या तरुणीनेही हे प्रकरण अतीच वाढवले, असेही काहींचे मत आहे, असे धक्कादायक विधानही चौधरी यांनी केले.
आसाराम बापूंचाच न्याय लावा
आसाराम बापूंवर ज्या पद्धतीने कारवाई झाली तशीच कारवाई तेजपाल यांच्याविरोधातही सुरू झाली पाहिजे, अशी मागणी संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी शुक्रवारी केली. सहा महिन्यांसाठी राजीनामा द्यायचे तेजपाल यांचे कृत्य म्हणजे धूळफेक आहे, असेही ते म्हणाले.

सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात
गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपाल यांनी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा या तरुणीचा आरोप आहे. या हॉटेलचे सीटीटीव्ही चित्रण गुरुवारी सायंकाळी गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची छाननी सुरू आहे. त्या तरुणीचा ईमेल व इतर कागदपत्रांची मागणीही गोवा पोलिसांनी
तहलका व्यवस्थापनाकडे केली आहे.

मैत्रिणीच्या अध्यक्षतेखाली समिती!
‘तहेलका’ने चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. मात्र या समितीच्या अध्यक्षा उर्वशी बुटालिया यांची तेजपाल यांच्याशी घनिष्ट मैत्री असताना ही समिती निष्पक्ष चौकशी कशी करील, या प्रश्नावर उद्विग्न होऊन व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी पत्रकारांना म्हणाल्या की, तुम्ही निष्कर्ष काढण्याची अतिशय घाई करीत आहात.