अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं काम वेगाने चालू आहे. दरम्यान, २२ जानेवारी रोजी या मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या दिमाखदार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारीदेखील चालू आहे. अशातच या सोहळ्यावरून राजकीय वक्तव्ये केली जात आहेत. विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी या सोहळ्याला राजकीय कार्यक्रम म्हटलं आहे, तर काहींच्या मते सत्ताधारी भारतीय जनता पार्टी या मंदिराद्वारे राजकारण करत आहे. अशातच बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री तेज प्रताप यादव यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. तेजप्रताप म्हणाले, २२ जानेवारी रोजी श्रीराम अयोध्येला येणार नाहीत. श्रीरामाने माझ्या स्वप्नात येऊन मला तसं सांगितलं आहे.
बिहारचे पर्यावरण मंत्री तेजप्रताप यादव म्हणाले, “श्रीराम माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी मला सांगितलं की, ते येत्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ते अयोध्येला येणार नाहीत. श्रीराम मला म्हणाले, सध्या अयोध्येत जे काही चाललंय ते ढोंग आहे. त्यामुळे मी त्या दिवशी तिकडे येणार नाही.” राजद नेते तेजप्रताप म्हणाले, निवडणुका आल्या की मंदिराचा विषय येतो. निवडणुका पार पडल्यानंतर मंदिराला कोणी विचारत नाही. कोणीही त्याबद्दल बोलत नाही.
बिहार सरकारमधील मंत्री तेज प्रताप यांनी अनेकदा त्यांच्या भाषणात स्वप्नांचा उल्लेख केला आहे. गेल्या वर्षीदेखील त्यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या स्वप्नाचा उल्लेख केला होता. तसेच तेजप्रताप यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत आधी ते झोपलेले दिसत होते. त्यानंतर ते उठले आणि म्हणाले, मी स्वप्नात भगवान श्रीकृष्णाचा रौद्र अवतार पाहिला.
हे ही वाचा >> भारत-मालदीव तणावादरम्यान मोहम्मद मुइज्जूंचा मोदी सरकारला इशारा, १५ मार्चचा अल्टीमेटम देत म्हणाले…
याआधी एकदा तेज प्रताप यादव सायकलवरून त्यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं, सकाळी नऊ वाजता मी झोपलो होतो. तेव्हा मुलायम सिंह यादव माझ्या स्वप्नात आले. मुलायमसिंह यांनी माझ्याशी वेगवेगळ्या विषयांवर बातचीत केली. मला मिठी मारली. त्यानंतर आम्ही दोघांनी बराच वेळ सायकल चालवली. त्यामुळेच मला आज वाटलं की, सायकलवरून ऑफिसला जाऊ. म्हणूनच मी सायकलवरून ऑफिसला आलो.