नितीश कुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नितीश कुमारांनी रविवारी राजभवनात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा दिला. त्याचबरोबर एनडीएचं सरकार स्थापन करण्याचा दावाही केला. तसेच भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याचं पत्रदेखील राज्यपालांकडे सादर केलं. हे पत्र राज्यपालांनी स्वीकारलं असून रविवारी (२८ जानेवारी) सायंकाळी पाच वाजता शपथविधीसाठी आमंत्रित केलं आहे. भाजपाचे बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
नितीश कुमार यांनी संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलमधील महाआघाडी तोडली आहे. नितीश कुमार हे आधी भाजपाबरोबर सत्तेत होते. परंतु, त्यांनी भाजपाशी असलेली युती तोडून राजदबरोबर सत्तास्थापन केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपाबरोबर घरोबा केला आहे. नितीश कुमार हे गेल्या १२-१३ वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या पक्षांबरोबर युती करून सत्तेत राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नेहमीच टीका केली जाते. नितीश कुमार यांनी भाजपाबरोबरची युती तोडून राजदबरोबर संसार थाटला तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार यांचा ‘पलटू कुमार’ असा उल्लेख करून त्यांच्यावर शेरेबाजी केली होती. आता तेच नितीश कमार राजदबरोबरची आघाडी तोडून पुन्हा भाजबाबरोबर सत्तेत बसणार आहेत. त्यामुळे राजद नेते नितीश कुमार यांच्यावर टीका करू लागले आहेत.
बिहारमधील ज्येष्ठ नेते तथा राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पूत्र आणि बिहारचे माजी पर्यटन मंत्री तेज प्रताप यादव यांनीदेखील नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तेज प्रताप यांनी एक्स या मायक्रब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, सरडा उगाच बदनाम आहे, रंग बदलण्याचा वेग पाहता ‘पलटिस कुमार’लाही एका गिरगिट रत्न पुरस्काराने सन्मानित करायला हवं.
हे ही वाचा >> ठरलं! बिहारमध्ये एनडीएचा प्रस्ताव राज्यपालांनी स्वीकारला, शपथविधीसाठी आमंत्रण; नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार?
नितीश कुमारांनी राजीनामा का दिला?
राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी पत्रकारांनी नितीश कुमार यांना विचारलं की, तुमच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची परिस्थिती का उद्भवली? यावर नितीश कुमार म्हणाले, बिहारचा राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता, त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. तुम्ही पत्रकारांनी मला यापूर्वीही अनेकदा याबाबत विचारलं होतं. परंतु, तेव्हा मी बोलणं बंद केलं होतं. मी मौन बाळगलं. कारण तेव्हा आम्ही सर्व परिस्थिती पाहत होतो. त्यानंतर मला लोक वेगवेगळे सल्ले देऊ लागले. मी माझ्या पक्षातील सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांची मतं जाणून घेतली. त्यानंतर आज राजीनामा दिला आहे आणि आमचं सरकार विसर्जित केलं आहे.