बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी सीबीआयनं ६ फेब्रुवारीला छापा टाकला. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना जमीनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय तपास करत आहे. यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. बिहारमध्ये ‘महागठबंधन’ सरकार स्थापन करतानाच याचा अंदाज आपल्याला आला होता, असं तेजस्वी यादव यांनी सांगितलं.
प्रसारमाध्यमांशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, “‘महागठबंधन’ सरकारचे विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर सांगितलं होतं, या गोष्टी होत राहणार. पण, भ्रष्टाचाराचे आरोप असलेला नेता भाजपात गेल्यावर त्याच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले जातात.”
हेही वाचा : “मुलं जन्माला घालू शकत नसल्यानेच राहुल गांधी…”, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान
“भाजपाबरोबर गेलात, तर तुम्ही राजा हरिश्चंद्र व्हाल. महाराष्ट्रात शरद पवारांचे पुतणे ( अजित पवार ) भाजपाबरोबर गेल्यावर ईडीने गुन्हे मागे घेतले होते. तृणमूल काँग्रेसचे मुकूल रॉय भाजपात गेल्यावर सर्व गुन्हे मागे घेण्यात आले. भाजपाला आरसा दाखवल्यावर किंवा प्रश्न विचारल्यावर असे प्रकार होतच राहणार,” अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.
काय आहे प्रकरण?
लालू प्रसाद यादव २००४ ते २००९ या काळात रेल्वेमंत्री होते. तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी जमिनीच्या मोबदल्यात लोकांना रेल्वेत नोकरी दिल्याचा आरोप आहे. यादव कुटुंबाने १.०५ लाख स्क्वेअर फुट जागेवर कथितपणे कब्जा केल्याचा दावा सीबीआयचा आहे. याप्रकरणी सीबीआयने १० ऑक्टोबर २०२२ ला आरोपपत्र दाखल केलं आहे. ज्यात १६ जणांना आरोपी करण्यात आलं होतं. तर, जुलै २०२२ मध्ये लालू प्रसाद यादव रेल्वेलमंत्री असताना त्यांचे ओएसडी असणारे भोला यादव यांना सीबीआयने अटक केली आहे.