नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नितीश कुमार यांनी राजदबरोबरची महाआघाडी तोडून बिहारमध्ये भाजपाबरोबर एनडीएचं सरकार स्थापन करणार आहेत. नितीश कुमार यांनी रविवारी (२८ जानेवारी) दुपारी राजभवनात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्याचबरोबर एनडीएचं सरकार स्थापन करण्याचा दावाही केला. यासाठी भारतीय जनता पार्टीने दिलेल्या पाठिंब्याचं पत्रदेखील त्यांनी राज्यपालांकडे सादर केलं आहे. राज्यपालांनी ते पत्र स्वीकारलं असून आज सायंकाळी शपथविधीसाठी आमंत्रित केलं आहे.
नितीश कुमार यांनी संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलमधील महाआघाडी तोडून भाजपाशी घरोबा केला आहे. त्यांनी याआधी भाजपा आणि राजद या दोन्ही पक्षांबरोबर अनेकवेळा सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे. अनेक नेते आणि पक्ष नेहमीच नितीश कुमारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. यापूर्वी नितीश कुमार यांनी भाजपाबरोबरची युती तोडून राजदबरोबर संसार थाटला तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार यांचा ‘पलटू कुमार’ असा उल्लेख करत त्यांच्यावर शेरेबाजी केली होती. आता तेच नितीश कुमार पुन्हा एकदा राजदबरोबरची आघाडी तोडून भाजबाबरोबर सत्तेत बसणार आहेत. त्यामुळे राजद नेते नितीश कुमार यांच्यावर टीका करू लागले आहेत.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीदेखील नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यादव म्हणाले, आम्ही खूप अपेक्षांसह सरकार स्थापन केलं होतं. ज्या उद्देशाने आम्ही सरकार बनवलं ती उद्दीष्टे नितीश कुमार यांनी त्यावेळी सांगितली होती. ते आता भाजपाबरोबर गेले आहेत. त्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. त्यामुळे त्यांना राज्यातली जनताच उत्तर देईल. त्यांनी किंवा इतर कोणीही आता केवळ कामाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. कामं आणि राज्याच्या विकासावर बोललं पाहिजे. कोण काय बोलतंय, काय बोलत नाही यावर चर्चा करण्याला काहीच अर्थ नाही. जे झालं तो आता इतिहास आहे. आम्ही पुढचा विचार करत आहोत. आम्ही जो विचार डोळ्यासमोर ठेवून सरकार बनवलं होतं, आमचं जे व्हिजन होतं ते नक्कीच पूर्ण करू. खेळ अजून बाकी आहे, आम्ही मिळून जनतेची स्वप्नं पूर्ण करू.
तेजस्वी यादव म्हणाले, नितीश कुमार काम करत नव्हते. त्यांच्याकडे कसलंच व्हिजन नव्हतं. ते थकले होते. एका थकलेल्या मुख्यमंत्र्याकडून आम्ही खूप काम करून घेतलं. त्यांनी आता जे काही केलं आहे त्याबद्दल आमच्या मनात राग नाही किंवा कुठलीही नाराजी नाही. आम्ही संयमाने युती धर्म निभावला आहे. परंतु, आता खरा खेळ सुरू झाला आहे. खरा खेळ अजून बाकी आहे. मी सांगतोय ते लिहून घ्या. जनता दल (संयुक्त) हा पक्ष २०२४ च्या निवडणुकीनंतर राजकारणातून नाहिसा होईल.
हे ही वाचा >> ठरलं! बिहारमध्ये एनडीएचा प्रस्ताव राज्यपालांनी स्वीकारला, शपथविधीसाठी आमंत्रण; नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार?
तेजस्वी यादव यांचे धाकटे बंधू आणि बिहारचे माजी पर्यटन मंत्री तेज प्रताप यादव यांनीदेखील नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. तेज प्रताप यांनी एक्स या मायक्रब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, सरडा उगाच बदनाम आहे, रंग बदलण्याचा वेग पाहता ‘पलटिस कुमार’लाही एका गिरगिट रत्न पुरस्काराने सन्मानित करायला हवं.