Tejashwi Yadav वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झालं आहे. आता या विधेयकाचं रुपांतर कायद्यात केलं जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिल्यानंतर या विधेयकाचं रुपांतर कायद्यात केलं जाईल. दरम्यान राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी वक्फ विधेयक आम्ही कचरापेटीत फेकू असं म्हटलं आहे. तसंच आम्ही या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
वक्फ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारकडून वक्फ दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले होते. विरोधी पक्षांच्या विरोधानंतरही हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. यानंतर विरोधी पक्षांतील काही खासदारांनी या विधेयका विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत २८८ विरुद्ध २३२ मतांनी मंजूर झाले होते. तर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने १२८ मते तर विरोधात ९५ मते पडली.
काय म्हणाले तेजस्वी यादव?
राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं, “आरक्षणाचा लढा लढण्यासाठी आम्ही मागासवर्गी आणि दलित यांच्यासाठी आम्ही सक्रय झालो होतो. भाजपाने आल्यानंतर आरक्षणाचा लढा थांबवण्यासाचे प्रयत्न केले, त्यासाठी कट रचले. आता आम्ही वक्फ सुधारणा विधेयकाविरोधातही आवाज उठवत आहोत. आम्ही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसंच तु्म्हाला शब्द देतो की बिहारमध्ये आमची सत्ता आली तर हे विधेयक आम्ही कचराकुंडीत फेकून देऊ.”
हे सरकार हिंदूंच्या जमिनीही बळकावेल-तेजस्वी यादव
तेजस्वी यादव पुढे म्हणाले, “मी हिंदू बांधवांना सांगू इच्छितो की केंद्र सरकारला असं मुळीच वाटत नाही की दलित, मागासवर्गीय आणि अतिमागास लोक हे समाजाच्या मुख्य प्रवासहाशी जोडले गेले पाहिजेत. या लोकांनी ६५ टक्के आरक्षणात खोडा घालण्याचं काम केलं. आम्हाला या सरकारचं धोरण चांगलंच माहीत आहे. आता मुस्लिमानंतर हे लोक शीख बांधव, ख्रिश्चन बांधवांच्या जमिनींवरही कब्जा करतील. एवढंच काय हिंदूंच्या जमिनी बळकावण्यासाठी सरसावतील. ज्या लोकांनी या विधेयकाचं समर्थन केलं आहे त्यांना निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील.” असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
नितीश कुमार एकमेव असे आहेत जे वक्फबाबत काहीच बोलले नाहीत-तेजस्वी यादव
मुंगेरमध्ये उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना अधिकारी मटण खाऊ घालत होते. नितीश कुमार यांचा फोटो आता हटवला जाऊन तिथे मोदींचा फोटो लावण्यात येतो आहे. भाजपाचे लोक कसंबसं निवडणुकीपर्यंत नितीशकुमारांना बरोबर ठेवतील. एकदा निवडणूक झाली आणि निकाल लागला की काय घडणार आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. वक्फची एवढी मोठी चर्चा संसदेत झाली. असा एक नेता दाखवा जो वक्फबाबत बोलला नाही. मात्र आमचे मुख्यमंत्री नितीश कुमार असे आहेत ज्यांनी वक्फबाबत चकार शब्दही काढला नाही. वक्फसाठी आम्ही संसदेत विरोध दर्शवला आता आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. न्यायालयात आणि रस्त्यावर आमचा वक्फ विरोधी लढा सुरुच राहिल असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.