सहकारी महिला पत्रकाराचा विनयभंग आणि लैंगिक हल्ला केल्याचा आरोप असलेले ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांनी आज (सोमवार) अटकपूर्व जामीनासाठी दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयात अर्ज केला. त्यामुळे तेजपाल यांची अटक तूर्त टळली आहे. दरम्यान, गोवा पोलिस आता मुंबईत पीड़ित पत्रकार महिलेची भेट घेणार आहेत.
गोवा पोलिसांनी सांगितले कि, तरुण तेजपाल यांच्याशी योग्य वेळी संपर्क साधण्यात येईल आणि चौकशी योग्य मार्गाने सुरू आहे. गोव्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक सॅमी टॅवरिस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिल्लीतील गोवा सदन येथे रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून तीन कर्मचाऱ्यांचा जबाब घेतला. मात्र या पथकाने तेजपाल यांची चौकशी केली नाही. मंगळवारी हे पथक संबंधित महिला पत्रकाराचा मुंबईत जबाब घेईल व त्यानंतर तेजपाल यांची चौकशी करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी तहलकाच्या कार्यालयातील हार्ड डिस्क व काही कागदपत्रे जप्त केल्याचेही समजते.