आपल्या सहकारी महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्याविरोधात जलदगती न्यायालयात खटला चालविण्याचा विचार आहे. तसेच या प्रकरणी पीडित तरुणीने ज्यांच्याशी संपर्क साधला ते तीनजण शुक्रवारी साक्षीसाठी गोवा न्यायालयासमोर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, गोवा येथील हॉटेलमधील प्रकार हा महिला पत्रकार आणि आपल्यामध्ये सहमतीने घडल्याचा दावा तेजपाल याने केला आहे.
या प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांना योग्य तो न्याय मिळेल,असा विश्वास पर्रिकर यांनी केला.
भाजपचे तत्कालीन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना एका प्रकरणात तहलकाच्या पत्रकाराने स्टिंग ऑपरेशन करून पैसे घेताना रंगेहाथ कॅमेऱ्यात कैद केले होते. त्यामुळे बंगारू यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र त्याचा तेजपाल यांच्याविरोधातील खटल्यावर परिणाम होणार नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपांचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले.
गोव्यातील हॉटेलच्या लिफ्टमध्ये घडलेल्या घटनेनंतर पीडित तरुणीने ज्या तिघांना त्याबद्दल सांगितले, त्या तिघांची शुक्रवारी गोवा न्यायालयासमोर साक्ष होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पणजी येथे दिली. तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादिका शोमा चौधरी यांनाही गोवा पोलिसांनी न्यायालयासमोर साक्ष देण्यासाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे त्यांनाही निवेदन सादर करण्यासाठी यावे लागणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी तेजपाल यांची सहा दिवसांच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे अधिक चौकशी करण्यासाठी गोवा पोलीस येत्या शनिवारी आणखी आठ दिवस तेजपाल यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे करणार आहेत. तेजपाल यांची चौकशी सुरू असून ते पोलिसांना सहकार्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तसेच तेजपाल यांची तिसऱ्यांदा वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader