‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिला पत्रकारावर तेजपाल कुटुंबीयांकडून दबाव येत असल्याच्या वृत्तानंतर या महिलेस पोलीस संरक्षण देण्याची मागणी पुढे येत आहे. राष्ट्रीय महिला हक्क आयोगाने रविवारी मुंबई पोलिसांकडे तशी मागणी केली. मात्र, तरुणीने पुढे येऊन संरक्षणाची मागणी केल्यास तिला संरक्षण पुरवले जाईल, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
पणजी येथे पोलिस उपमहानिरीक्षक ओ. पी. मिश्रा यांनी सांगितले, की तेजपाल यांच्याशी आमच्या पथकाचा संपर्क झालेला नाही. प्रत्येक मिनिटागणिक चौकशीतील माहिती देता येणार नाही. आम्ही योग्य दिशेने वाटचाल करीत आहोत. सोशल मीडियात अनेक गोष्टी येत आहेत ज्या लैंगिक हल्ला छळवणूक प्रकरणात पाळावयाच्या तत्त्वांना मारक आहेत. प्रसारमाध्यमांनी यातील संवेदनशीलता बघून वार्ताकन करावे, पीडित महिलेस आणखी त्रास होईल असे काही करू नये. चुकीचे वार्ताकन केल्यास त्याचे गुन्हेगारी स्वरूपाचे परिणाम होऊ शकतात व त्याची आम्ही दखल घेतली आहे, त्यावर कायदेशीर कारवाई करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही.
दरम्यान, तेजपाल यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचे ठरवले असून, प्रसारमाध्यमातील बातम्यांनुसार तेजपाल यांनी सदर तरुणी खोटे बोलत असून आपल्याला अडकवत आहे असे म्हटले आहे. यामागे काही राजकीय शक्ती आहेत असा आरोप तेजपाल यांनी केला.
‘तहलका’ नियतकालिकाने ट्विटर पोस्टवर असे म्हटले आहे, की चौधरी यांनी गोवा पोलिसांनी मागितलेली सर्व कागदपत्रे त्यांना दिली व चौकशीत सहकार्य केले. ही घटना नेमकी कधी त्यांच्या निदर्शनास आली. नेमका घटनाक्रम काय होता, याबाबत चौधरी यांना प्रश्न विचारण्यात आले. पोलिसांनी चौधरी, पत्रकार महिला व तेजपाल यांच्यातील इमेल संदेशही ताब्यात घेतले आहेत. चौधरी यांचा मोबाइल फोन, टॅब्लेट फोन, लॅपटॉप यांचीही पोलिसांनी तपासणी केली.   

Story img Loader