तेलंगणमध्ये सत्ताधारी पक्षाच्या चार आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी यावर मौन सोडलं आहे. दिल्लीच्या दलालांना आमच्या पक्षाच्या चार आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा राजकारणाला बळ देत असल्याचंही ते म्हणाले आहेत. भाजपाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुख्यमंत्र्यांची राजकीय खेळी असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला आहे.
तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समितीच्या आमदारांनी पक्षांतर करावं यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतलं. फार्महाऊसवर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. आमदारांनीच पोलिसांना फोन करुन ही माहिती दिली होती.
“दिल्लीतील काही दलाल तेलंगणच्या स्वाभिमानाला आव्हान देण्यासाठी आले होते. त्यांनी आमदारांना १०० कोटींची ऑफर दिली,” असं चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. यावेळी मंचावर त्यांच्यासोबत ते चारही आमदार उपस्थित होते.
“आपण आवाज उठवत असल्याने तेलंगण ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही जेव्हा मतदान कराल, तेव्हा काळजीपूर्वक करा असं माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे. आपण अशा राजकारणाला बळी पडू शकत नाही,” असं आवाहन चंद्रशेखर राव यांनी केलं आहे.
पोलिसांनी तिघांना अटक केली असून यामधील एकजण व्यवसायिक आहे. रामचंद्र भारती उर्फ सतीश शर्मा, नंदा कुमार आणि सिम्हयाजी अशी या तिघांची नावं आहेत. तिघांना १४ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
तेलंगण राष्ट्र समितीचे आमदार रोहित शेट्टी यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार रामचंद्र भारती आणि नंदा कुमार हे दोघेही भाजपाशी संबंधित असून पक्षात प्रवेश करण्यासाठी १०० कोटींची ऑफर दिली होती.