स्वतंत्र तेलंगणानिर्मितीचा निर्णय कटू आणि आव्हानात्मक असला तरी आपला देश अशाप्रकारचे निर्णय घेण्यास समर्थ असल्याचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. तेलंगणा विधेयक मंजुरीचा अत्यंत कठीण वाटणारा निर्णय घेण्यात यश आल्यामुळे अशाप्रकारचे आव्हानात्मक निर्णय घेण्यास भारत सज्ज असल्याचे सिद्ध झाले आहे. लोकसभेत गेले काही दिवस घोषणाबाजी आणि विरोधाचे वातावरण होते मात्र, शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सामोपचाराचे असे अगदी उलट चित्र पहायला मिळाले. तेलंगणानिर्मितीच्या निर्णयामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होईल, या निर्णयाचे महत्व समजून येण्यासाठी वेळ जाईल परंतू; सरतेशेवटी अशाचप्रकारचे निर्णयच देशाला प्रगतीच्या नवीन पायवाटांवर नेतील अशा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. सरकारच्या आजवरच्या कारकिर्दीचे मुल्यमापन करण्याची संधी आगामी निवडणुकांच्या रूपाने जनतेसमोर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे काँग्रेस पक्ष सत्तेत आला तरी आपण पंतप्रधानपदासाठी इच्छूक नसल्याचे मनमोहनसिंग यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा