गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण एका महाविद्यालयात उभा असल्याचं दिसत असून तो दुसऱ्या एका तरुणाला मारहाण करत असल्याचं आणि त्याच्यावर दादागिरी करत असल्याचं दिसत आहे. हा तरुण तेलंगणा भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार बांडी संजय कुमार यांचा मुलगा असल्याची बाब आता समोर आली असून त्यावरून भाजपाकडून आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर आरोप केले जात आहेत.
नेमका काय आहे प्रकार?
सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिग्दर्शक-निर्माते राम गोपाल वर्मा यांनीही हा व्हिडीओ ट्वीट करून बांडी संजय कुमार यांच्यावर टीका केली आहे. या व्हिडीओमध्ये संजय कुमार यांचा मुलगा भगीरथ दुसऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करताना आणि त्याच्यावर दादागिरी करताना दिसत आहे. तसेच, यावेळी भागीरथचे काही मित्रही या मुलावर दादागिरी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरून आता राजकीय सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.
घटना नेमकी कधीची?
दरम्यान, ही घटना घडून काही दिवस उलटल्याचा दावा बांडी संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. “हा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला आहे. पण त्याचा व्हिडीओ आत्ताच कसा लीक झाला? मी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या मुलावर टीका केल्यामुळेच हा व्हिडीओ आता लीक करण्यात आला आहे का? की विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे?” असे प्रश्न संजय कुमार यांनी उपस्थित केले आहेत.
भगीरथविरोधात गुन्हा दाखल!
दरम्यान, पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत भगीरथविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात सविस्तर चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, संजय कुमार यांनी मुलाची पाठराखण केली आहे. “मुलं कधीकधी एकमेकांशी भांडतात. पण नंतर पुन्हा एकत्र येऊन मित्रही होतात. त्या मुलानंही त्याचीच चूक होती, असा व्हिडीओ जारी केला आहे. तरीही हा सगळा वाद निर्माण केला जात आहे”, असा आक्षेप संजय कुमार यांनी नोंदवला आहे.