तेलंगणा विधानसभा मुदतीआधी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. तेलंगणा मंत्रिमंडळाने एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला असून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्यपाल ईएसएल नरसिंहम यांची भेट घेऊन त्यांना या निर्णयाची माहिती दिली. राज्यपालांनी त्यांचा हा प्रस्ताव मंजूर केला असून नवीन सरकार सत्तेवर येईपर्यंत चंद्रशेखर राव यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. राव यांनी गुरूवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुदतपूर्व विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे राव यांनी विधानसभा बरखास्तीचा निर्णय घेतला. तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) सरकारचा कार्यकाळ मे २०१९ पर्यंत आहे. तत्पूर्वीच टीआरएस सरकारने हा निर्णय घेतला. दरम्यान, राव हे ६ तारीख शुभ मानतात. त्यामुळेच त्यांनी आज हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

या वर्षाअखेर चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांबरोबर तेलंगणा विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू होत्या. विधानसभा बरखास्त केल्यानंतर राव हे रंगारेड्डी जिल्ह्यातून एका मोठ्या रॅलीचे आयोजन करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच राज्यात मुदतपूर्व निवडणुका होण्याची चर्चा सुरू झाली होती. कोणत्याही परिस्थिती काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. टीआरएस आणि भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून जवळीकताही वाढली होती. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या होत्या.