तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “पंतप्रधान मोदी आपल्या सावकार मित्रासाठी देशातील राज्यांवर त्यांनी आयात केलेला चारपट, पाचपट महागडा कोळसा खरेदी करण्यासाठी दबाव टाकत आहेत. तसेच हा १० टक्के आयात कोळसा न घेतल्यास कोल इंडियातून पुरवठा बंद करू अशी धमकी देत आहेत,” असा आरोप केसीआर यांनी केला. ते हैदराबादमध्ये घेतलेल्या सभेत बोलत होते. यावेळी मंचावर विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा देखील उपस्थित होते.
के. चंद्रशेखर राव म्हणाले, “मोदींना मला एक प्रश्न विचारायचा आहे. देशात देवाने म्हणा किंवा निसर्गाने १०० वर्षे पुरेल इतकी कोळशाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. अजूनही सर्व्हे सुरू आहेत आणि त्यात आणखी कोळसा सापडत आहे. दरवर्षी ५,००० ते १०,००० मिलियन टन कोळसा काढला जातो. इतके नैसर्गिक संसाधनं असताना असताना तुम्ही परदेशातून कोळसा आयात का करता? याचं उत्तर द्या. तुमच्या भाषणात उत्तर द्या, म्हणजे संपूर्ण देशाला कळेल. तुमची काय अडचण आहे?”
“मोदी सावकार मित्रांच्या कोळसा खरेदीसाठी राज्यांवर दबाव टाकत आहेत”
“मोदींची अडचण ही आहे की त्यांना त्यांच्या सावकार मित्रांना मदत करायची आहे. तुमचा तर नाईलाज आहेच, पण तुम्ही राज्यांच्या सरकारांवरही दबाव टाकत आहात. आदेशावर आदेश दिले जात आहेत. राज्यांना १० टक्के आयात केलेला कोळसा वापर करा, नाहीतर कोल इंडियातून तुमचा कोळसा पुरवठा बंद केला जाईल, अशी धमकी दिली जात आहे. ही काय दादागिरी, जबरदस्ती आहे? ही लोकशाहीची मर्यादा आहे का?” असा प्रश्न केसीआर यांनी विचारला.
“मनात येईल ते करा, आम्ही असले आदेश पाळणार नाही”
“मी यशवंत सिन्हा यांच्यासमोर सांगतो की मोदी सरकारच्या या आदेशाला आम्ही नकार दिला. मनात येईल ते करा, आम्ही असले आदेश पाळणार नाही. आमचा एक इतिहास आहे. कोल इंडियाशिवाय भारतात एकच राज्य आहे ज्याच्याकडे कोळसा खाण आहे ते राज्य म्हणजे तेलंगणा आणि ही खाण म्हणजे सिंगारेनी कॅलरीज. आम्ही सांगितलं की आमचा स्वतःचा कोळसा आहे तर आम्ही तुमच्याकडून विकत का घ्यायचा?” असाही सवाल मुख्यमंत्री केसीआर यांनी केला.
“भारतात कोळसा ४ हजार रुपये प्रतिटन, मोदींचा कोळसा २५-३० हजार रुपये प्रतिटन”
के. चंद्रशेखर राव पुढे म्हणाले, “आश्चर्यकारक बाब म्हणजे भारतात ४ हजार रुपयांमध्ये एक टन मिळतो. मोदींचा कोळसा २५-३० हजार रुपये प्रतिटन आहे. चारपट, पाचपट किंमत देऊन कोण खरेदी करेल? ही एवढी किंमत आहे कारण मोदींचा एक मित्र परदेशातून हा कोळसा आयात करतो. तुम्ही पंतप्रधानाचं काम करत नाहीये. तुम्ही तुमच्या सावकार मित्रांचे सेल्समन म्हणून काम करत आहात.”
हेही वाचा : “भाजपाच्या धर्मांध द्वेषपूर्ण वक्तव्यासाठी भारताने माफी का मागायची?”; तेलंगणाच्या मंत्र्यांचा सवाल
“तुमच्या कोळसा आयात धोरणामुळे आम्ही तुम्हाला दोषी ठरवत आहोत”
“आम्ही तुमची व्यक्तिगत निंदा करत नाही. तुमच्या कोळसा आयात धोरणामुळे आम्ही तुम्हाला दोषी ठरवत आहोत. तुम्ही दोषी नाही, तुमची बाजू सत्य आहे, तर उत्तर द्या. तुम्ही संपूर्ण भारतातील तुमची फौज हैदराबादमध्ये उतरवून जी सभा घेत आहेत तेथे माझ्या या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही सभा घेताय, घ्या, आम्हाला आनंद आहे. मात्र, आम्ही आज जनतेचे जे प्रश्न उपस्थित करत आहोत त्यांची उत्तरं या सभेतून द्या. तुम्ही निर्दोष आहात तर देशाला या प्रश्नांची उत्तरं द्या,” असं आव्हान केसीआर यांनी मोदींना दिलं.