Ramzan 2025: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रमजानचा महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणाच्या मुख्य सचिवांनी या संदर्भातील आदेश जारी केला आहे. आदेशानुसार, राज्यातील मुस्लिम कर्मचाऱ्यांना रमजान महिन्यात कार्यालय किंवा शाळा एक तास आधी सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही सूट २ मार्च ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू असणार आहे. हा आदेश सरकारी कर्मचारी तसेच कंत्राटी, आऊटसोर्सिंग, बोर्ड आणि सार्वजनिक क्षेत्रातील मुस्लिम कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे. मात्र, तेलंगणा सरकारच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घणाघाती टीका केली आहे.

तेलंगणा सरकारच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाच्या नेते टीका करत आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाचे नेते एकमेकांवर टीका करत असल्यामुळे चांगलंच राजकारण तापलं आहे. तेलंगणा सरकारच्या या निर्णयावर भाजपाने तिखट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा निर्णय म्हणजे काँग्रेसचा भेदभाव करण्याचा प्रयत्न आहे. कारण नवरात्रीच्या उपवासात हिंदूंना अशी कोणतीही सूट दिली जात नाही, अशी टीका भाजपाच्या नेत्यांनी केली आहे.

दरम्यान, रमजानचा पवित्र महिना १ किंवा २ मार्चपासून सुरू होऊ शकतो. मात्र, त्याआधी तेलंगणाच्या सरकारने मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश जारी केला आहे. यानुसार मुस्लिम कर्मचाऱ्यांना रमजान महिन्यात एक तास आधी कार्यालयातून जाण्याची परवानगी मिळणार आहे. हा आदेश राज्य कर्मचाऱ्यांसह मुस्लिम शिक्षक, कंत्राटी कर्मचारी, आउटसोर्सिंग बोर्ड आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू असेल. पण आपत्कालीन किंवा विशेष गरज भासल्यास कर्मचाऱ्यांना कार्यालयातच राहावे लागणार आहे. या आदेशानंतर मुस्लीम कर्मचाऱ्यांना इफ्तारच्या चार वाजण्यापूर्वी शाळा किंवा कार्यालय सोडता येणार आहे. राज्य सरकारचा हा आदेश ३१ मार्चपर्यंत लागू असणार आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

भाजपाच्या नेत्यांनी काय म्हटलं?

तेलंगणा सरकारच्या या निर्णयावर भाजपाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. या निर्णयाच्या विरोधात भाजपा नेते अमित मालवीय यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत म्हटलं आहे की, काँग्रेसने रमजान दरम्यान मुस्लिम राज्य कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या तास कमी केले. पण जेव्हा नवरात्रीमध्ये हिंदू उपवास करतात तेव्हा अशा प्रकारची सवलत मिळत नाही. मात्र, काँग्रेस केवळ मतांचं राजकारण करतंय. याला विरोध झाला पाहिजे”, असं त्यांनी म्हटलं आहे.

Story img Loader