लोकसभेत तेलंगणा विधेयक मांडताना अभूतपुूर्व गदारोळ झाला. सकाळी अकरा वाजता तेलंगणाविरोधक सदस्यांच्या गोंधळामुळे तासाभरासाठी कामकाज तहकूब. त्यानंतरचा घटनाक्रम
*दुपारी बारा वाजता कामकाज सुरू झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तेलंगणा विधेयक सादर करण्यासाठी उभे राहिले. त्याबरोबर काँग्रेसमधील निलंबित तेलंगणाविरोधक, तेलुगू देसम पक्ष व वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांनी मीरा कुमार यांच्या आसनाकडे धाव घेतली. काँग्रेस सदस्य राज बब्बर, अझरुद्दीन यांना या सदस्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना न जुमानता हे सदस्य पुढे सरसावले.
*तेलुगू देसम पक्षाचे सदस्य एम. वेणुगोपाल रेड्डी यांनी सभापतींसमोरील माईक उखडून टाकला. सभापतींच्या समोर असलेले सारी कागदपत्रे त्यांनी हिसकावून घेतली. त्याच वेळी राजगोपाल यांनी लोकसभा सचिवांच्या टेबलावरील काच फोडली. तेवढय़ावर त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी हातातील स्प्रे हवेत फवारला. त्यामुळे गोंधळात अजूनच भर पडली. हा ‘स्प्रे’ कशाचा होता हे कळण्यापूर्वीच अनेक सदस्यांना अस्वस्थ वाटू लागले.
*तृणमूल काँग्रेसचे खासदार सुगत रॉय यांनादेखील खोकल्याची उबळ आली. संसदेतील वैद्यकीय पथकाने तातडीने सभागृहात धाव घेतली. भाजप सदस्या सुमित्रा महाजन यांनादेखील अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले.
*स्प्रेची तीव्रता इतकी होती की प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी असलेल्या दीघ्रेत (प्रेस गॅलरी) काहींना अस्वस्थ वाटू लागले.
* ‘स्प्रे’ प्रकरणानंतर संसद परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनादेखील तपासणीनंतरच सभागृहात सोडण्यात येत होते.
*या प्रकरणामुळे भारतीय लोकशाहीला काळिमा फासल्याची व्यथित प्रतिक्रिया मीरा कुमार यांनी दिली. कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब.
*स्प्रेमुळे अनेक सदस्यांचे डोळे चुरचुरू लागले. काहींना घशात जळजळ सुरू झाली. इंदौरच्या भाजप खासदार सुमित्रा महाजन यांच्यासह अन्य दोन सदस्यांना नजीकच्या राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर ते रुग्णालयातून घरी परतले.
*नियम ३७४ (अ) अंतर्गत गोंधळ घालणाऱ्या सतरा खासदारांना मीरा कुमार यांनी निलंबित केले. त्यात काँग्रेसचे सब्बम हरी, ए. व्ही. रेड्डी, एस.पी. वाय. रेड्डी, एम. श्रीनिवासलू रेड्डी, व्ही. अरुण कुमार, ए. साई प्रथाप, एल. राजगोपाल, सुरेशकुमार शेटकर, के. आर. जी. रेड्डी, जी. सुधाकर रेड्डी तर वायएसआरचे काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी व एम. राजमोहन रेड्डी यांचा समावेश होता. तेलुगू देसम पक्षाचे एन. क्रिस्तप्पा, के. नारायण व एन. सिवप्रसाद यांनाही निलंबित करण्यात आले. संबंधित खासदारांनी निलंबन मान्य नसल्याची घोषणा करीत दुपारी पुन्हा सभागृहात जाणार असल्याचे सांगितले.
*‘स्प्रे’ प्रकरणानंतर लोकसभेच्या दर्शक गॅलरीत प्रवेश रोखण्यात आला. त्यामुळे देशाच्या विविध भागांतून संसदेचे कामकाज पाहावयास आलेल्यांची निराशा झाली.
*दुपारी तीन वाजता कामकाज सुरू होण्यापूर्वी सभागृहात दाखल झाल्यावर केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांना एका खासदाराचे खिसे तपासत ‘स्प्रे’ नसल्याची खात्री करून घेतली. त्यावर ‘काही सापडले का, असा मिस्कील प्रश्न माजी मंत्री मुकुल वासनिक यांनी विचारला.
*पीठासीन अधिकाऱ्यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.
संसदेत मिरपूड फवारण्याची कृती अक्षम्य आणि सदनाची प्रतिमा मलिन करणारी असून, यात सामील असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी खासदारांनी केली आहे.
लोकसभेतील ही घटना संसदेचा लौकिक धुळीला मिळवणारी आहे आता सरकारने केवळ लेखानुदान मंजूर करून घ्यावे, इतर कोणतेही विधेयक मांडू नये.
लालकृष्ण अडवाणी,भाजप नेते
लोकसभेत जो गोंधळ झाला त्याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. काँग्रेस नेतृत्वाने याबाबत पुरेशी तयारी करून, आपल्या सदस्यांवर नियंत्रण ठेवले असते तर ही घटना टाळता आली असती .
अरुण जेटली, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते
आपण अशा प्रकारची घटना कारकिर्दीत कधीच पाहिली नव्हती. तो अक्षम्य असून सदनाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारा आहे.
जसवंत सिंह, भाजप नेते
सरकार या घटनेबाबत असंवेदनशील आहे. या मुद्दय़ावर आंध्रमध्ये तणाव आहे हे सरकारने ध्यानात घ्यायला हवे होते. चर्चेच्या मार्गाने सरकार हा मुद्दा का सोडवत नाही. आपल्या संसदीय कारकिर्दीत पहिल्यांदा अशी घटना पाहिली.
सुमित्रा महाजन, भाजप खासदार
लोकशाहीच्या विरोधी ही घटना आहे. हा देशद्रोह आहे. यामध्ये सहभागी असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. शब्दांमध्ये याचा निषेध करणे अवघड आहे तसेच तो सहज विसरता येणार नाही.
शरद यादव, संयुक्त जनता दल अध्यक्ष
तेलंगण विधेयकावरून गुरुवारी लोकसभेतील गदारोळात तेलुगू देशमच्या के नारायण राव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तर सदनात मिरपूड फवारल्याने अनेक खासदार धावत सदनाबाहेर आले.
तेलंगण विधेयकावरून लोकसभेत रणकंदन
लोकसभेत तेलंगणा विधेयक मांडताना अभूतपूर्व गदारोळ झाला. सकाळी अकरा वाजता तेलंगणाविरोधक सदस्यांच्या गोंधळामुळे तासाभरासाठी कामकाज तहकूब. त्यानंतरचा घटनाक्रम
First published on: 14-02-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana crisis 18 andhra mps suspended from lok sabha over ruckus in parliament