आंध्र प्रदेशाचे विभाजन करण्याच्या निर्णयामुळे किनारी व रायलसीमा यांचा एकत्र भाग असलेल्या सीमांध्रात संतप्त भावना उमटल्या असून तेथे ७२ तासांच्या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर किनारी भागातील श्रीकाकुलम, रायलसीमातील अनंतपूर येथे मोठय़ा प्रमाणात निदर्शने करण्यात आली. सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्ग रोखण्यात आले, शाळा-महाविद्यालये, सरकारी कार्यालये बंद करण्यात आली. काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले.
 विजयवाडा येथे हजारो तरूण रस्त्यावर आले असून त्यांनी तेलंगण निर्मितीच्याविरोधात निदर्शने केली. विझाग, विजयनगरम, श्रीकाकुलम, चित्तूर, गुंटूर, अनंतपूर, कडापा, कुर्नूल येथे निदर्शनांचा भडका उडाला आहे. पल्लम राजू यांच्यासह काही केंद्रीय मंत्र्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसल्यानंतर वायएसआर काँग्रेसचे नेते वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून सीमांध्रच्या सर्व लोकप्रतिनिधींना राजीनामा देण्याचे आवाहन केले आहे. सीमांध्र सचिवालयात कर्मचाऱ्यांची पोलिसांशी झटापट झाली. तेथे हिंसक निदर्शनेही झाली. मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी अनेक खासदार व आमदार यांची त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. राज्यसभा खासदारांनी रेणुका चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राजीनामे देण्याचे ठरवले असल्याचे दुपारी समजले. अनेक संवेदनशील ठिकाणी काल रात्री हिंसाचाराची शक्यता गृहीत धरून पोलिस व निमलष्करी दले तैनात करण्यात आली होती.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी सत्यनारायण यांच्या निवासस्थानी निदर्शकांनी विजयनगरम येथे हलाल केला. अनेक ठिकाणी लोकांनी खासदार आमदारांच्या निवासस्थानी वेढा घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तेलगंणचा विषय अलोकशाही पद्धतीने हाताळला असे विजयवाडाचे खासदार राजगोपाल यांनी सांगितले. गुंटूरचे खासदार रायापती सांबशिव राव यांनी राजीनामा दिला असून सीमांध्रात काँग्रेस पक्ष संपल्यात जमा झाल्याचे सांगितले. येत्या निवडणुकीत पक्षाची हार होईल असे ते म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सीमांध्रात तेलंगणाच्या निर्णयामुळे झालेली निदर्शने स्वाभाविक असल्याचे सांगून जिथे नवीन राज्य तयार केले जाते तिथे अशा भावन असणारच, अशी प्रतिक्रिया दिली. लोकांच्या मनात कटुतेच्या भावना असणे स्वाभाविक आहे, पण त्यांची समजूत काढणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

Story img Loader