तेलंगणाच्या प्रश्नावरून लोकसभेत शुक्रवारी पुन्हा एकदा रणकंदन झाले. पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेल्या तेलुगू देसम पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा एकदा लोकसभेत तेलंगणाच्या मुद्दय़ावरून गोंधळ घातल्याने दुपापर्यंत सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले. अखेर अध्यक्षांनी दुपारी ३ वाजता सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
देशाच्या आर्थिक स्थितीवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निवेदनच शुक्रवारी केवळ सभागृहात होऊ शकले. सीमांध्रतील तेलुगू देसम आणि काँग्रेसच्या खासदारांनी तेलंगणाच्या मुद्दय़ावरून सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेतली.
तृणमूल काँग्रेसने उपस्थित केलेला रुपया वाचवा मुद्दा, बिहार आणि उत्तर प्रदेशात आलेल्या पुराचा राजदने उचललेला मुद्दा आणि अभाअद्रमुकने तामिळी मच्छीमारांचा उचललेला मुद्दा यावरूनही शुक्रवारी सभागृहात मोठा गोंधळ झाला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी उत्तराखंडमधील पुराबाबतच्या चर्चेला सुरुवात केली. तेवढय़ात आंध्र प्रदेशातील खासदारांनी हातात फलक घेत सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेतली. ‘वुई वॉण्ट युनायटेड आंध्र प्रदेश’, ‘जस्टिस टू तेलुगू पीपल’ अशा घोषणा लिहिलेले फलक खासदारांनी सभागृहात फडकाविले.
विरोधी पक्षनेत्यांचा राजीनामा
हैदराबाद : केंद्रातील काँग्रेस सरकारने आंध्र प्रदेशचे ज्या पद्धतीने विभाजन करण्याचा निर्णय घेतला त्याच्या निषेधार्थ तेलुगु देशम पक्षाचे पॉलिटब्युरो सदस्य आणि राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यनमला रामकृष्णनुडू यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
यनमला यांनी यापूर्वी विधानसभेचे अध्यक्षपदही भूषविले असून त्यांनी आपला परिषद सदस्यत्वाचा राजीनामा परिषदेचे सभापती ए. चक्रपाणि यांच्याकडे पाठविला, असे सूत्रांनी सांगितले.
सीमांध्रमध्ये सध्या जे वातावरण आहे त्याला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या एकमेव जबाबदार आहेत. त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी सदर प्रश्न पेटविला होता, असा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला.जनभावनांची कदर न करता राज्य सरकार आणि यूपीए सरकार आगीत तेल ओतत असल्याचेही ते म्हणाले.