वेगळ्या तेंलगणा राज्यनिर्मितीच्या मुद्द्यावरून राजधानी नवी दिल्लीमध्ये मंगळवारी हालचालींना वेग आलाय. यूपीए सरकार वेगळ्या तेलंगणा राज्य निर्मितीची मंगळवारी संध्याकाळी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी सकाळी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली.
वेगळ्या तेलंगणावर चर्चा करण्यासाठी यूपीएच्या समन्वय समितीची बैठक मंगळवारी दुपारी चार वाजता बोलावण्यात आलीये. या बैठकीनंतर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून, त्यानंतर वेगळ्या तेलंगणा राज्य निर्मितीचा घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
वेगळ्या तेलंगणा राज्यनिर्मितीला विरोध करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री एम. एम. पल्लमराजू यांच्यासह जे डी सीलम, डी. पुरंदेश्वरी यांनी कॉंग्रेसचे आंध्र प्रदेशचे प्रभारी दिग्विजयसिंह यांची भेट घेतली. वेगळ्या तेलंगणा निर्मितीला पक्षातील या नेत्यांचा विरोध आहे. कॉंग्रेसमध्ये वेगळ्या तेलंगणा निर्मितीवरून फूट पडल्यामुळे यातून मार्ग कसा काढायचा, यावर सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अगदी सामान्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. वेगळ्या तेलंगणाचा निर्णय झालाच तर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने निमलष्करी दलाचे अतिरिक्त एक हजार जवान आंध्र प्रदेशला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने यापूर्वीच रायलसीमा आणि किनारपट्टीच्या भागात १२०० जवान तैनात केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा