हैदराबाद : तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांच्यावर टीका करणारी चित्रफीत प्रसारित केल्याने दोन महिला पत्रकारांना बुधवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पल्स डिजिटल न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनेलच्या कार्यकारी संचालक रेवती पोगांदादनंदा (वय ४४) तसेच तन्वी यादव ऊर्फ बंडी संध्या (वय २५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

विरोधी पक्ष असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) मुख्यालयात ही अपमानास्पद चित्रफीत तयार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागाच्या राज्य सचिवांनी तक्रार दिली. रेड्डी यांची बदनामी करण्याचा प्रयत्न चित्रफितीमध्ये असून याद्वारे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप तक्रारीत करण्यात आला.

विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर ही चित्रफीत प्रसारित करण्यात आली होती असे अतिरिक्त पोलीस आयुक्त पी. विश्वप्रसाद यांनी नमूद केले. यात मुख्यमंत्र्यांबाबत अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचे प्रसाद यांनी नमूद केले.