अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिचा तीन वर्षांपूर्वी झालेला घटस्फोट आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. समांथानं २०२१मध्ये अभिनेता नागा चैतन्यशी घटस्फोट घेतला होता. मात्र, आता तीन वर्षांनंतर तेलंगणा सरकारमधील एका महिला मंत्र्यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा या घटस्फोटावर चर्चा होऊ लागली. यासंदर्भात समांथानं तिच्या इन्स्टाग्रामवर संतप्त पोस्ट शेअर केल्यानंतर संबंधित मंत्र्यांनी बिनशर्त माफी मागत आपलं विधान मागे घेतलं आणि घटस्फोट प्रकरणावर अखेर पडदा पडला!

नेमकं काय घडलं?

या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली ती तेलंगणाच्या पर्यावरण व वनमंत्री कोंडा सुरेखा यांच्या एका विधानामुळे. कोंडा सुरेखा यांनी आधीच्या सरकारमधील प्रमुख नाव केटीआर अर्थात के. टी. रामाराव यांच्यावर दोन दिवसांपूर्वी टीका केली. यामध्ये केटीआर यांच्यामुळे चित्रपटसृष्टीमधील महिला कलाकारांवर अन्याय झाल्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यात समांथा रुथ प्रभू व नागा चैतन्य यांचा घटस्फोटही केटीआर यांच्यामुळेच झाला होता, असा दावा कोंडा सुरेखा यांनी केला.

एका कन्व्हेन्शन हॉलच्या पाडकामासंदर्भातला मुद्दा आधी नागा चैतन्य, मग केटीआर आणि शेवटी कोंडा सुरेखा यांच्या स्वत:कडे आल्यानंतर त्याच प्रकरणातून पुढे या दोघांचा घटस्फोट झाल्याचा खळबळजनक दावा कोंडा सुरेखा यांनी केला होता. त्यावरून बराच वाद निर्माण झाला. खुद्द समांथानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत कोंडा सुरेखा यांना जबाबदारीनं वागण्याबाबत सुनावलं.

समांथा प्रभूची संतप्त पोस्ट

“माझा घटस्फोट हा आम्ही दोघांनी सामंजस्यानं घेतलेला निर्णय होता. त्यात कोणत्याही राजकीय कट-कारस्थानाचा हात नाही. मला आशा आहे की तुमच्या शब्दांना एक मंत्री म्हणून किती महत्त्व आहे याची तुम्हाला कल्पना असेल. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जबाबदारीनं आणि इतरांच्या वैयक्तिक गोपनीयतेचा आदर राखून तुमचं वर्तन ठेवाल”, असं समांथानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Samantha Ruth Prabhu Divorce: “माझा घटस्फोट…”, समांथा रुथ प्रभू तेलंगणाच्या मंत्र्यांच्या ‘त्या’ दाव्यावर संतापली; म्हणाली, “जबाबदारीनं वागा”!

कोंडा सुरेखा यांनी अखेर मागितली माफी!

दरम्यान, एकीकडे समांथाची पोस्ट व्हायरल होत असताना दुसरीकडे खुद्द केटीआर यांनी कोंडा सुरेखा यांना विधानासंदर्भात कायदेशीर नोटीस बजावली. याची माहितीही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. अखेर शेवटी कोंडा सुरेखा यांनी एक्सवर पोस्ट करत केलेलं विधान बिनशर्त मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

“एका नेत्याकडून महिलांना दिल्या जात असलेल्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी ते विधान केलं होतं. त्यात कुठेही समांथा प्रभू हिच्या भावनांना धक्का पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता. तू ज्याप्रकारे स्वत:च्या हिंमतीवर इथवर पोहोचली आहेस, ते माझ्यासाठी कौतुकास्पदच नसून आदर्शवतही आहे. जर माझ्या विधानामुळे तुझ्या किंवा तुझ्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी बिनशर्त माझं विधान मागे घेते. त्यातून गैरअर्थ काढू नये”, असं या पोस्टमध्ये कोंडा सुरेखा यांनी नमूद केलं आहे.

काँग्रेसवर टीका

दरम्यान, कोंडा सुरेखा यांच्या विधानावरून केटीआर यांनी थेट राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. राहुल गांधींनी तातडीने कोंडा सुरेखा यांना पदावरून काढून टाकून त्यांना व मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवायला हवं, अशी टीका केटीआर यांनी केली आहे.