Telangana : तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील अमीनपूर शहरात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अमीनपूर शहरातील मुलींच्या एका खासगी वसतिगृहात छुपा कॅमेरा आढळून आला आहे. या घटनेमुळे संगारेड्डी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावर अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर या प्रकरणात पोलिसांनी वसतिगृहाच्या वॉर्डनला अटक केली असून या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
नेमकं काय घटना घडली?
अमीनपूर शहरात असलेल्या मुलींच्या एका खासगी वसतिगृहात एक छुपा कॅमेरा आढळून आला आहे. वसतिगृहातील एका खोलीत छुपा कॅमेरा आढळून आला. या घटनेला वसतिगृहाचा वॉर्डन जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी त्याला अटक देखील झाली आहे. तसेच पोलिसांनी छुपा कॅमेरा जप्त केला आहे. त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या डेटाची तपासणी फॉरेन्सिक लॅबकडून करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
एका खासगी महिला वसतिगृहात मोबाईलच्या चार्जरमध्ये हा छुपा कॅमेरा बसवला होता अशी धक्कादायक बाब समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी वसतिगृहाच्या मालकाला ताब्यात घेत या घटनेची चौकशी सुरु केली आहे. अमीनपूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एका वसतिगृहातील क्रमांक ७५ मध्ये राहणाऱ्या एका तरुणीला वसतिगृहात छुपा कॅमेरा आढळून आला. त्यानंतर तिने या प्रकाराबाबत वसतिगृहात राहणाऱ्या दुसऱ्या सदस्य़ांना माहिती दिली. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरु केली. तसेच छुपा कॅमेरा देखील पोलिसांनी जप्त केला असून त्या कॅमेऱ्याची तपासणी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, या घडलेल्या प्रकारामुळे आता संबंधित वसतिगृह चौकशीच्या फेऱ्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अमीनपूरच्या पोलीस निरीक्षकांनी सांगितलं की, “आम्ही जप्त केलेल्या पुराव्यांची पडताळणी करत आहोत आणि प्रकरणाची सखोल चौकशी देखील करण्यात येणार आहे.” दरम्यान, या घटनेमुळे वसतिगृहांमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच असे प्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात येत आहे.