तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज दसऱ्याच्या मुहुर्तावर राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली आहे. ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ने राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर या पक्षाचे नामकरण ‘भारत राष्ट्र समिती’ असे करण्यात आले आहे. तेलंगणा भवनातील पक्षातील नेत्यांच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. ‘टीआरएस’चे ‘भारत राष्ट्र समिती’मध्ये रुपांतर करण्याचा ठराव पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला. केसीआर यांचा राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश आगामी २०२४ च्या निवडणुकीचा दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
नामकरणानंतर पक्षाच्या झेंड्यावर असलेले कारचे चिन्ह कायम राहणार आहे. या झेंड्यावर भारताचा नकाशा असणार आहे, अशी माहिती तेलंगणाचे गृहमंत्री महमूद अली यांनी दिली आहे. तेलंगणा भवनातील या बैठकीला २८३ आमदार, खासदार आणि जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. ख्रिश्चन नेत्यांनी के. चंद्रशेखर राव यांना पाठिंबा जाहीर करत त्यांच्या राष्ट्रीय पदार्पणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पक्षाच्या बैठकीत केसीआर यांना पाठिंबा दर्शवणारा प्रस्तावही उपस्थित नेत्यांनी संमत केला आहे. दरम्यान, “केसीआर यांचा राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश गैरप्रकार असल्याचे म्हणत भाजपाने यावर टीका केली आहे. आपले सरकार आर्थिकदृष्ट्या चालवण्यासाठी राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाची आखणी करणं अयोग्य आहे”, असे तेलंगणा भाजपाचे मुख्य प्रवक्ते के. क्रिष्णा सागर राव यांनी म्हटले आहे.
“टीआरएसचे नाव बीआरएस केल्याने राष्ट्रीय पक्ष कसा बनू शकतो याचे मला आश्चर्य आहे. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी विविध राज्यांमधील मतदारांचा पाठिंबा मिळवणे आवश्यक असते”, असे राव म्हणाले आहेत.’ ‘तेलंगणा मॉडेल’ प्रत्यक्षात नसून ती केवळ केसीआर यांच्या मनातील कल्पना असल्याची टीकाही राव यांनी केली आहे.