Telangana SLBC Tunnel Collapse Updates : तेलंगणातील श्रीशैलम डावा किनारा कालवा (एसएलबीसी) प्रकल्पाच्या खचलेल्या बोगद्यात अडकलेल्या आठ मजुरांच्या सुटकेची आशा धूसर झाली आहे. पण तरीही देव काहीतरी चमत्कार करेल आणि मजूर घरी परततील अशी आशा त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे. यात अडकलेले अनेक कामगार हे त्यांच्या घरातील एकमेव कमावते होते, मात्र आता त्यांच्या जगण्याचीच आशा धूसर झाल्याने नातेवाईकांनी चिंता व्यक्त केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने काही मजुरांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांची मनस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

शनिवारी सकाळपासून तेलंगणाच्या नगरकुरनूल जिल्ह्यात बोगद्याच्या आत १३.५ किलोमीटर अंतरावर छताचा एक भाग कोसळल्याने अडकलेल्या आठ जणांची ओळख पटली आहे. मनोज कुमार आणि श्री निवास हे उत्तर प्रदेशचे आहेत; संदीप साहू, जगता क्षेस, संतोष साहू आणि अनुज साहू हे झारखंडचे आहेत; सनी सिंग हे जम्मू आणि काश्मीरचे आहेत; आणि गुरप्रीत सिंग हे पंजाबचे आहेत.

फोनची रिंग वाजेल अन्…

पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील चीमा कलान गावात, गुरप्रीत सिंगची आई दर्शन कौर आणि पत्नी राजविंदर कौर चिंतेने ग्रासल्या असून गुरप्रीतच्या परतीसाठी त्यांनी देवाकडे धावा सुरू केला आहे. राजविंदर म्हणाल्या की तिचा नवरा तेलंगणामध्ये जवळपास २० वर्षांपासून मशीन ऑपरेटर म्हणून काम करत आहे. “माझ्या वडिलांचे निधन झाल्यावर ते २० दिवसांपूर्वी घरी आले होते आणि पाच-सात दिवसांपूर्वीच कामावर निघून गेले होते. शनिवारी कामावर जाण्यापूर्वी मी त्यांच्याशी शेवटचे बोलले आहे. मी माझ्या फोनला चिकटूनच आहे. मला आशा आहे की मोबाईलची रिंग वाजेल आणि दुसऱ्या बाजूला माझे पती असतील.”

कंपनीने काहीही कळवलं नाही, सरकारनेही समन्वय साधला नाही

दररोज सकाळी, गुरप्रीत तिला आणि त्यांच्या मुलांना व्हिडिओ कॉल करून उठवत असे. “माझ्या मुली त्यांच्या वडिलांचा आवाज ऐकल्याशिवाय उठत नव्हत्या. पण शनिवारपासून त्यांचा फोन आलेला नाही”, असंही त्या म्हणाल्या. गुरप्रीतचा चुलत भाऊ परगत सिंग चीमा म्हणाला की, बोगद्यात जाण्याआधी त्याने त्याचा फोन बाहेर ठेवला होता. आम्ही त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी फोन केला असता त्याच्या सहकऱ्यांनी फोन उचलला. त्यामुळे आम्हाला या घटनेची माहिती झाली. अन्यथा आम्हाला कंपनीकडून कोणी कळवलंही नसतं. संपूर्ण देश टीव्हीवर ही घटना पाहत असताना पंजाब सरकारने तेलंगणा अधिकाऱ्यांशी अद्याप संपर्क साधलेला नाही.”

वाहेगुरू चमत्कार करतील

गुरुप्रीतच्या दोन्ही मुली सीबीएसई बोर्डात असून मोठी १६ वर्षांची मुलगी आता दहावीला आहे. त्यांची आई वृद्ध असून त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झालं. त्यामुळे गुरुप्रीत हे त्यांच्या घरातील एकमेव कमावते व्यक्ती आहेत. “शनिवारपासून आम्ही टीव्हीवर चिकटून आहोत. आम्हाला आशा आहे की वाहेगुरू चमत्कार करतील. आम्ही टीव्हीवर वाईट बातम्या ऐकत असलो तरीही त्यावर आमचा विश्वास नाही. आमच्या आशा अजूनही जाग्या आहेत”, असा आशावदही गुरुप्रीतच्या पत्नीने व्यक्त केला.

तरनतारनचे उपायुक्त राहुल यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की , “आतापर्यंत कुटुंबाने आमच्याशी संपर्क साधलेला नाही, परंतु आम्हाला घटनेची माहिती आहे. आतापर्यंत, आम्हाला तेलंगणा सरकारकडून गुरप्रीतबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.”

भावांच्या शिक्षणासाठी त्याने लग्नच केलं नाही

झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील बघिमा गावातील आणखी एक कुटुंबही बोगद्यातील बचाव कार्याच्या बातमीची उत्सुकतेने वाट पाहत आहे. कारण गावातील संदीप साहू (२७) या बोगद्यात अडकला आहे. त्याला तीन भाऊ असून एक बहिण आहे. या भावंडांमध्ये तो सर्वात मोठा असून तो कुटुंबाचा एकमेव कमावता आधार आहे. “संपूर्ण कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे. तो माझ्या धाकट्या भावाच्या अभ्यासाचा खर्च उचलत होता. तो अनेक वर्षांपासून बांधकाम ठिकाणी काम करून कुटुंबाला मदत करत आहे. म्हणूनच त्याने लग्नही केले नाही”, असे त्याचा भाऊ अर्जुन साहू म्हणाला. “माझे वडील काम करत नाहीत आणि आम्ही दोघे धाकटे भाऊ अजूनही शिक्षण घेत आहोत, त्यामुळे कुटुंबात तो एकमेव कमावणारा सदस्य आहे”, असंही अर्जुन म्हणाला.

झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील आणखी एक कामगार, ३७ वर्षीय संतोष साहू हे देखील बोगद्यात अडकलेल्यांमध्ये आहेत. त्यांची पत्नी आणि तीन मुले आहेत जे त्यांच्या मूळ गावी तिर्रा येथे राहतात. “ते कुटुंबात सर्वात मोठे आहेत आणि एकमेव कमावते आहेत. त्यांना दोन भाऊ आहेत”, त्याचा रूममेट अजय कुमार साहू म्हणाला. “संतोषची पत्नी आणि वडील बचाव कार्याबद्दल विचारण्यासाठी फोन करतात तेव्हा त्यांना काय सांगावे हे मला कळत नाही”, असंही अजय कुमार म्हणाला.

Story img Loader