सीमांध्रमध्ये जोरदार निदर्शने सुरू असली तरी आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे स्पष्ट केले. तथापि, आंध्र प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.
स्वतंत्र तेलंगणाबाबत स्थापन करण्यात आलेला मंत्र्यांचा गट आपला अहवाल शक्य तितक्या लवकर देणार असून आंध्र प्रदेशला न्याय दिला जाईल, असेही शिंदे म्हणाले. मंत्रिगट लवकरात लवकर अहवाल देणार असल्याने या निर्णयासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही, असेही ते म्हणाले.
आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या विरोधात सीमांध्रमध्ये जोरदार निदर्शने करण्यात येत असल्याने या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार का, असे विचारले असता शिंदे यांनी, त्याबाबत सध्या आपण कोणतेही भाष्य करू शकत, नसल्याचे सांगितले.
सीमांध्रमध्ये उग्र निदर्शने करण्यात आल्याने तेलंगणानिर्मितीच्या निर्णयाचा फेरविचार केला जाईल का, या प्रश्नाला शिंदे यांनी नकारार्थी उत्तर दिले. निर्णयात बदल होण्याची कोणतीही शक्यता नाही, असेही ते म्हणाले. तेलंगणाबाबतचे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येईल का, या बाबत त्यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही.

Story img Loader