Telangana Liquor Thief : तेलंगणातून नुकतेच एक गमतीशीर प्रकरण समोर आले आहे. तिथे एक चोर चोरीसाठी दारूच्या दुकानात घुसला यावेळी त्याने रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या चोरल्या, पण दारू पिण्याचा मोह न आवरल्याने तो अति प्रमाणात दारू प्यायला आणि मद्यधुंद अवस्थेत तिथेच आडवा झाला. दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी दुकान उघडताच चोर मंद्यधुंद अवस्थेत झोपल्याचे आढळले. हा चोर चोरी करण्यासाठी दुकानाच्या छताची कौले काढून दुकानात शिरला होता. त्यानंतर त्याने दुकानातील सर्व सीसीटीव्ही बंद केले आणि रोख रक्कम व दारूच्या बाटल्या गोळा केल्या होत्या. पण, ही चोरी करताना त्याला दारू प्यावीशी वाटली आणि तो यामध्ये फसला.
दरम्यान हे प्रकरण तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील आहे. याबाबत माहिती देताना कनकदुर्गा वाईन्स या दुकानाचे व्यवस्थापक नरसिंग म्हणाले, “आम्ही रविवारी रात्री १० वाजता दुकान बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता आम्ही दुकान उघडले तेव्हा हा चोर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला. यानंतर आम्ही त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले होते. त्याने दुकानात प्रवेश करण्यासाठी छताची कौले काढली होती. यावेळी त्याने दुकानातील रोक रक्कम आणि दारूच्या बाटल्या चोरल्या होत्या.” याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.
दारूच्या नशेत असलेल्या चोराची अद्यापही ओळख पटलेली नाही. पोलिसांनी त्याचावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे, परंतु पोलीस चोर शुद्धीत येण्याची वाट पाहत आहेत. पोलिसांनी सांगितले की, चोराने पॉलिथिन बॅगमध्ये पैसे आणि दारूच्या बाटल्या भरल्या होत्या. निघताना त्याला दारूचा मोह झाला आणि त्याने मनसोक्त प्यायली. त्यामुळे तो मद्यधुंद अवस्थेत तिथेच झोपी गेला.
पोलीस उपनिरीक्षक अहमद मोईनुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सोमवारी रात्रीपर्यंत तो शुद्धीवर आला नसल्याने त्याची ओळख पटलेली नव्हती.
आणखी वाचा : लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तान्यांचे आंदोलन; ‘किल मोदी पॉलिटिक्स’ अशी घोषणाबाजी
गेल्या वर्षी दिल्लीत घडली होती अशीच घटना
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्लीतही अशीच एक घटना घडली होती. दिल्ली पोलिसांनी कृष्णा नगरमधील वाईन शॉपमध्ये घुसल्याचा आरोप असलेल्या २७ वर्षीय तरुणाला अटक केली होती.आरोपीने दुकानातून दारू प्यायली आणि आतच झोपी गेला होता. याबाबत हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिले आहे.