Telangana Tunnel Collapse : तेलंगणा राज्यातील नागरकुरनूल जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. नागरकुरनूल जिल्ह्यातील एका बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान सहा कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बचावकार्य सुरु करण्यात आले असल्याची माहिती देण्यात येत आहे.
ही दुर्घटना घडली तेव्हा बोगद्यात किती कामगार होते? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार किमान ६ ते ८ लोक अडकले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेबाबत तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्या निवेदनात म्हटलं आहे की, “या दुर्घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना व अग्निशमन विभाग आणि हैदराबाद आपत्ती प्रतिसाद आणि मालमत्ता संरक्षण संस्थेतील (HYDRAA) कर्मचाऱ्यांना तात्काळ मदत आणि उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.” या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, एका बोगद्याचं बांधकाम सुरु होतं. या कामासाठी काही कामगार आत गेले होते आणि त्याचवेळी बोगद्याचा काही भाग अचानक कोसळला. राज्याचे पाटबंधारे मंत्री उत्तम कुमार रेड्डी आणि पाटबंधारे सल्लागार आदित्य नाथ दास, आयजी सत्यनारायण आणि डीजी अग्निशमन सेवा जीव्ही नारायण राव हे देखील घटनेकडे लक्ष देऊन आहेत. तसेच त्यांनी या दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच राज्याचे पाटबंधारे मंत्री उत्तम कुमार रेड्डी आणि पाटबंधारे सल्लागार आदित्य नाथ दास, आयजी सत्यनारायण आणि डीजी अग्निशमन सेवा जीव्ही नारायण राव हे हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती सांगण्या येत आहे.
A Portion of Roof of the SLBC Tunnel Collapsed, many injured, few feared Trapped in Tunnel.
— Surya Reddy (@jsuryareddy) February 22, 2025
Reportedly around 3-meters roof of the #tunnel at #Srisailam Left Bank Canal (#SLBC) Project in #Nagarkurnool, collapsed at the 14th km mark, 5-7 workers feared trapped, most have safely… pic.twitter.com/DZ80NJ5lOi
तसेच श्रीशैलम ते देवरकोंडाच्या दिशेने जाणाऱ्या श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्याच्या १४ किमी अंतरावरील गळती सील करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काँक्रीटच्या भागाच्या घसरणीमुळे ही दुर्घटना घडल्याचीही प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. याबाबत आता मदतकार्य सुरु आहे. तसेच या घटनेत कोणी जखमी झाले असल्यास जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं निवेदनात म्हटलं आहे. तसेच या संपूर्ण घटनेच्या परिस्थितीकडे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे देखील लक्ष देऊन असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.