वेगळ्या तेलंगणाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात गेल्या पाच दिवसांपासून नवी दिल्लीतील उपोषणाला बसलेल्या तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांना शुक्रवारी दिल्ली पोलीसांनी बळजबरीने आंध्र भवनमधून हलवले. नायडू यांच्या समर्थकांनी पोलीसांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मोडून काढत नायडू यांना रुग्णवाहिकेतून आंध्र भवनातून बाहेर काढण्यात आले. 
आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळे तेलंगणा राज्य निर्माण करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप नायडू यांना केला होता. कॉंग्रेस बळजबरीने हा निर्णय लादत असल्याचे त्यांनी म्हंटले होते. मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधातच त्यांनी गेल्या सोमवारपासून उपोषण सुरू केले होते. दोन दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून हैदराबादमध्ये उपोषणाला बसलेल्या वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनाही अशाच पद्धतीने बळजबरीने रुग्णालयात हलविण्यात आले होते.
पोलीसांच्या विनंती नंतरही नायडू यांना उपोषण मागे घ्यायला नकार दिला होता. मी कोणता गुन्हा केला आहे. चांगल्या कारणांसाठीच मी उपोषणाला बसलो आहे. मग मला आंध्र भवनातून का हलविण्यात येते आहे, असा सवाल नायडू यांनी पोलीसांना विचारला.
दरम्यान, वेगळ्या तेलंगणाप्रकरणी केंद्रीय मंत्रिगटाची पहिली बैठक शुक्रवारी झाली. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या मंत्रिगटाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली ही बैठक झाली. आंध्र प्रदेशमधील लोकांची चिंता समजून घेऊन त्यावर वस्तूनिष्ठ उत्तर शोधले जाईल, असे आश्वासन या मंत्रिगटाने दिले. या विषयावर १९ ऑक्टोबर रोजी होणाऱया बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

Story img Loader