Telangana Cop Murder : तेलंगणात एका २८ वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलची भावानेच कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. भावाने पीडितेवर हल्ला केला तेव्हा ती पतीशी फोनवर बोलत होती. या घटनेमागे ऑनर किलिंग किंवा आरोपी आणि पीडितेमध्ये संपत्तीचा वाद असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हैदराबादच्या सीमेवर तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील इब्राहिमपट्टणम परिसरात सोमवारी सकाळी ही घटना घडली. एस नागमणी या महिला कॉन्स्टेबलने २१ नोव्हेंबर रोजी यादगिरीगुट्टातील वेगळ्या जातीचा असलेल्या श्रीकांतशी विवाह केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागमणीच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता आणि तिचा भाऊ परमेशने याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती.
या जोडप्याचे लग्न झाल्यानंतर मृत तरुणीच्या कुटुंबियांचे आणि भावाचे हे लग्न स्वीकारण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावून समुपदेशन करण्यात आले होते. याचबरोबर जोडप्याला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये असे सांगण्यात आले होते. मात्र, यानंतरही पीडितेच्या भावाने त्यांना धमक्या दिल्याचा आरोप मृत कॉन्स्टेबलच्या पतीने केला आहे.
काय म्हणाला पीडितेचा पती?
या सर्व प्रकरणाची माहिती देतानी मृत कॉन्स्टेबलचा पती म्हणाला, “मी दुसऱ्या जातीचा असल्याने नागमणीच्या कुटुंबियांचा आमच्या नात्याला विरोध होता. त्यामुळे त्यांनी १० वर्षांपूर्वीच नागमणीचे लग्न लावून दिले होते. पण दोन वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाल्यानंतर आम्ही पुन्हा संपर्कात आलो होतो. आम्ही काही दिवसांपूर्वीच लग्न केले होते.” मृत तरुणीचा पती तेलंगणाच्या कृषी विभागाचा कर्मचारी आहे.
संपत्तीचा वाद
२१ नोव्हेंबर रोजी विवाह केल्यानंतर तरुणीच्या भावाकडून धमक्या येत असल्याने या जोडप्याने पोलिसांत धाव घेतली होती. “नागमणी कुटुंबाच्या संपत्तीमधील वाटा मागत असल्याने तिचा भाऊ संतापला होता. तो, नागमणीला मारणार असल्याचे गावातील अनेकांना म्हणाला होता”, असे मृत तरुणीच्या पतीने पोलिसांना सांगितले.
हे ही वाचा : भारतीय पोलाद उद्योगाला झटका बसणार? डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
कारने पाठलाग आणि कुऱ्हाडीने वार
या घटनेतील आरोपीने कारने आपल्या बहिणीचा पाठलाग करत तिला टक्कर देत दुचाकीवरून पाडले. गाडीवरून पडताच नागमणीने पतीला फोन करत भावाने हल्ला केल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने नागमणीच्या मानेवर व छातीवर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत नागमणीचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेला महेश्वरमच्या पोलीस उपायुक्त डी सुनीता रेड्डी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.