Pavel Durov claims: आयुष्मान खुरानाचा विकी डोनर हा सिनेमा अनेकांना आठवत असेल. मुलं न होणाऱ्या पालकांसाठी या चित्रपटातील विकी हे पात्र स्पर्म डोनर म्हणून काम करते. या सामाजिक विषयाला विनोदाची झालर चढवून विकी डोनर सिनेमा आला तेव्हा अनेकांनी त्याचे कौतुक केले. पण खऱ्याखुऱ्या आयुष्यातील विकी डोनर सध्या पुढे आला आहे. टेलिग्राम या जगप्रसिद्ध ॲपचा सीईओ पावेल दुरोव याने स्वतःच टेलिग्रामवर पोस्ट टाकून याचा खुलासा केला असून त्याला १०० जैविक मुले आहेत, असे तो म्हणाला आहे. टेलिग्रामच्या ५.७ दशलक्ष युजर्सबरोबर त्याने ही बातमी शेअर केली आहे. विशेष म्हणजे पावेल दुरोव हा स्वतः अविवाहित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मित्राच्या आग्रहामुळे पहिल्यांदा शुक्राणू दान

पावेल दुरोव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, १५ वर्षांपूर्वी माझ्या मित्राने माझ्याकडे एक विचित्र मागणी केली होती. माझ्या मित्राला आणि त्याच्या पत्नीला मूल होत नव्हते. ते त्यासाठी उपचार घेत होते. मात्र मित्राने जेव्हा मला स्पर्म डोनेट करण्याबद्दल सांगितले, तेव्हा मला हसू आवरले नाही. पण मित्र मात्र त्यावर ठाम होता. त्याने मला सांगितले की, तो ज्या रुग्णालयात मूल होण्यासाठी प्रयत्न करतोय, त्यांच्याकडे चांगल्या दर्जाचे शुक्राणू नाहीत. त्यामुळे मी जर ते देण्यास तयार झालो, तर त्यातून अनेक दाम्पत्यांना फायदाच होईल, असे त्या रुग्णालयानेही सांगितले.

हे वाचा >> “माझ्याबरोबर काय काय केलं, हे सांगितलं तर पवार साहेबांना त्रास..”, चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

पावेल दुरोव पुढे म्हणाले की, शुक्राणू दान करण्यामुळे आता २०२४ मध्ये जगातील १२ देशांमध्ये माझे शंभरहून अधिक जैविक मुले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपूर्वीच आयव्हीएफ क्लिनिक्सना शुक्राणू दान करण्याचे काम थांबविले असल्याचेही दुरोव यांनी सांगितले.

अब्जाधीश असलेल्या पावेल दुरोव यांनी आता त्यांच्या जैविक मुलांना डिएनएच्या मदतीने एकत्र आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. ते त्यांच्या डीएनएचा ओपनसोर्स बनविणार आहेत, जेणेकरून त्यांचे जैविक मुले एकमेकांना भविष्यात शोधू शकतील. शुक्राणू दान केल्याच्या कामाबाबत बोलताना दुरोव म्हणाले की, मला याचा अभिमान वाटतो. जगभरात सध्या ही समस्या भेडसावत आहे. शुक्राणूंचा दर्जा घसरत असताना मी कुणाच्या तरी कामी आलो, याचा आनंद वाटतो. चांगली आरोग्य असलेल्या लोकांनी हे काम करण्यासाठी पुढे यायला हवे, असेही ते म्हणाले.

दुरोव यांनी टेलिग्रामवर ही भूमिका जाहीर केल्यानंतर अनेकांनी त्याचे स्क्रिनशॉट काढून एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर शेअर केला. त्याठिकाणी अनेकांनी त्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telegram ceo pavel durov claims he has over 100 biological kids reveals how kvg