इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या मागच्या पाच दिवसांपासून युद्ध आणि संघर्ष सुरु आहे. आत्तापर्यंत ३६०० हून अधिक लोकांचा यामध्ये बळी गेल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिलं आहे. हमासच्या योद्ध्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं आहे. त्यांना गाझा पट्टी भागात ठेवण्यात आलं आहे. त्यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. तिथे इस्रायली लोकांना गन पॉईंटवर ठेवण्यात आल्याचं दिसतं आहे. ओलीस ठेवण्यात आलेल्या लोकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. इस्रायलने हवाई हल्ले थांबवले पाहिजेत नाहीतर आम्ही कुणालाही सोडणार नाही अशी धमकीच हमासने दिली आहे.
व्हायरल व्हिडीओत काय आहे?
व्हायरल व्हिडीओ हमासकडून लाइव्ह स्ट्रिम केलं जातं आहे. या व्हिडीओत इस्रायली कुटुंबाला गन पॉईंटवर ठेवण्यात आल्याचं दिसतं आहे. या व्हिडीओत हेदेखील दिसतं आहे की एका माणसाच्या पायातून रक्त वाहतं आहे, त्याच्या बाजूला त्याची पत्नी बसल्याचंही दिसतं आहे. तसंच या महिलेच्या मांडीवर एक छोटी मुलगीही बसल्याचं दिसतं आहे जी रडते आहे.
हमासचे बंदुकधारी त्यांना सांगत आहेत इस्रायल या तुमच्या देशाशी व्हिडीओतून बोला. त्यांना सांगा तुम्ही इथे आहात. त्यानंतर तो माणूस सांगतो की हमासचे लोक आमच्या घरात आहेत माझ्या पायावर गोळी झाडण्यात आल्याचं सांगतो आहे.
जो माणूस या व्हिडीओत दिसतो आहे त्याच्या पायावर हमासकडून गोळी झाडण्यात आली आहे. तसंच संपूर्ण कुटुंबाला गन पॉईंटवर ठेवण्यात आल्याचंही दिसतं आहे. हमासचा एक सदस्य त्याच्याकडे आय कार्ड मागतो. त्यावर तो इस्रायली सांगतो यासाठी मला उठावं लागेल. उठताना त्याला होणारा त्रासही व्हिडीओत दिसतो आहे. बंदुकीच्या जोरावर हमासचे लोक हे इतर लोकांना घर सोडून जायला सांगत आहेत.
हमासने इस्रायलला दिली धमकी
पॅलेस्टाईनमधली संघटना असलेल्या हमासने इस्रायलला धमकी दिली आहे की त्यांनी तातडीने रॉकेट हल्ले थांबवावेत, अन्यथा आम्ही १५० लोकांना ओलीस ठेवलं आहे. जर गाझा पट्टीवर हवाई हल्ला झाला तर ओलीस ठेवलेल्यांपैकी एक-एक व्यक्तीला ठार केलं जाईल.