दाक्षिणात्य अभिनेता आणि पुष्पा चित्रपटातून देशभरात ओळख मिळालेला अल्लू अर्जुन अडचणीत आला आहे. आगामी पुष्पा २ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये अल्लू अर्जुन व्यस्त आहे. त्यातून वेळ काढत अल्लु अर्जूनने मित्रासाठी लोकसभेचा प्रचार केला. मात्र प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप ठेवून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आणि नांदयाल लोकसभेचे उमेदवार शिल्फा रविचंद्र किशोर रेड्डी यांच्या प्रचारासाठी अल्लू अर्जुन मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी शिल्पा रेड्डी यांच्या निवासस्थानी भेट दिली.
ही घटना शनिवारी (११ मे) घडली. अल्लू अर्जून शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांच्या निवासस्थान पोहोचल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. अल्लू अर्जूनची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी जोरदार गोंधळ घातला. गर्दीमधून पुष्पा, पुष्पा अशी घोषणाबाजीही सुरू होती. जवळपास तासभर अल्लू अर्जून याठिकाणी उपस्थित होता.
वायव्य मुंबईत महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी १०० तृतीयपंथीय
नांदयालचे तहसीलदारांनी शहरातील पोलीस ठाण्यात अल्लू अर्जुनच्या विरोधात तक्रार दाखल केली. अल्लु अर्जुनने निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिरवणूक काढणे किंवा निवडणुकीचा प्रचार करण्याची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तसेच त्याने उमेदवाराच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली ज्यामुळे सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
पोलिसांनी अल्लू अर्जुनच्या विरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्लू अर्जुनने चार पेक्षा अधिक लोक जमा करून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ चेही उल्लंघन केले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच आंध्रप्रदेश पोलीस कायद्याच्या कलम ३१ नुसारही त्याला दोषी मानन्यात आले आहे.
अल्लू अर्जुन याने २०१९ मध्येही नांदयालच्या आमदार शिल्पा रेड्डी यांच्यासाठी प्रचार केला होता.