मेलबोर्न : ऑस्ट्रेलियात सिडनीतील एका प्रसिद्ध हिंदू मंदिराची खलिस्तानी समर्थकांकडून शुक्रवारी कथितरित्या विटंबना करण्यात आली. या मंदिरात भारतविरोधी भित्तिचित्रे लावण्यात आली. या महिना अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांच्या मोडतोडीच्या घटनांपैकी ही एक ताजी घटना आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना सिडनीतील रोझहिल येथील श्री स्वामीनारायण मंदिरात घडली. या मंदिराच्या पदाधिकाऱ्यांना या मंदिराच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानी ध्वज लावलेला आढळला. त्यांनी या घटनेची माहिती न्यू साऊथ वेल्स पोलिसांना दिली, असे वृत्त ‘ऑस्ट्रेलिया टुडे’ या वृत्तपत्राने दिले आहे.

या मंदिराकडून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की रोझहिल येथील श्री स्वामीनारायण मंदिरातील भिंतींवर भारतविरोधी चित्रे पाहून आम्हाला अतीव दु:ख झाले आहे. ऑस्ट्रेलियात स्वामीनारायण मंदिरांना लक्ष्य केले जात असल्याने आम्ही व्यथित आहोत. या घटनेची माहिती मिळताच खासदार अँडर्य़ू चार्लटन यांनी या मंदिरास भेट दिल्याचे वृत्त ‘ऑस्ट्रेलिया टुडे’ या वृत्तपत्राने दिले आहे.

शांततेचे आवाहन

मंदिरातर्फे यावेळी सांगण्यात आले, की स्वामीनारायण संस्था शांतता आणि ऐक्यासाठी प्रार्थना करते. समाजातील सर्व भक्त आणि हितचिंतकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आम्ही स्थानिक पोलीस, गृह विभाग, प्रांतीय आणि संसदेच्या सदस्यांचे आभारी आहोत. या संदर्भात भारतीय उच्चायुक्तालय आणि सिडनीच्या वाणिज्यदुतांनी सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temple in sydney vandalised by pro khalistani zws