Kanhaiya Kumar : आगामी बिहार विधानसभेची निवडणूक पाहता राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे दौरे सध्या बिहारमध्ये सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसने देखील बिहार विधानसभेसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु केली असल्याचं बोललं जात आहे. या अनुषंगानेच काँग्रेस नेते कन्हैया कुमार हे सध्या बिहारच्या दौऱ्यावर असून त्यांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या विविध जिल्ह्यात पदयात्रा काढण्यात येत आहे. ‘स्थलांतर थांबवा, नोकऱ्या द्या’ असा मुद्दा घेऊन ते पदयात्रा काढत आहेत.

कन्हैया कुमार हे सहरसा जिल्ह्यातील एका गावात पोहोचले होते. यावेळी कन्हैया कुमार हे एका मंदिरात गेले होते. मात्र, यानंतर हे मंदिर गंगाजलाने शुद्ध करण्यात आले असल्याची चर्चा आहे. ही घटना बनगाव गावातील दुर्गा मंदिरात घडली असल्याचं बोललं जात आहे. कन्हैया कुमार यांनी त्यांच्या पदयात्रेदरम्यान या मंदिराला भेट दिली होती. यावरून आता काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु झालं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

या संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये कन्हैया कुमार यांनी ते गाव सोडल्यानंतर काही लोकांनी मंदिर धुतल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मात्र, या विषयावर कन्हैया कुमार यांनी भाष्य करण्याचं टाळलं आहे. पण या विषयासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते ज्ञान रंजन गुप्ता यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की फक्त आरएसएस आणि भाजपा समर्थकच धार्मिक लोक आहेत आणि बाकीचे अस्पृश्य आहेत का? खरं तर हा अनादर नाही का?”, असा सवाल त्यांनी विचारला.

दरम्यान, या विषयाबाबत भाजपाचे प्रवक्ते असित नाथ तिवारी यांनी म्हटलं की, “सर्वप्रथम कन्हैया कुमार यांच्या भेटीनंतर मंदिर धुणाऱ्यांची ओळख आपण पडताळली पाहिजे. जर काँग्रेस नेत्याच्या भेटीनंतर मंदिर धुतले गेले तर ते नागरिक कन्हैया कुमार यांच्या राजकारणाला नाकारत आहेत हे यावरून दिसून येत आहे.” तसेच बनगाव गावातील एका रहिवाशाने सांगितलं की, “सहसा सर्व जाती धर्माच्या लोकांना मंदिरात प्रवेश दिला जातो. पण कन्हैया कुमार यांच्या भेटीनंतर मंदिर गंगाजलाने शुद्ध करण्याचे काम काही दुष्टांचे असू शकते”, असं एका रहिवाशाने सांगितलं.