पीटीआय, इम्फाळ : इम्फाळच्या न्यू लंबुलेन भागात २४ सदस्यांचा समावेश असलेल्या शेवटच्या दहा कुकी कुटुंबांचे मणिपूर सरकारने स्थलांतर केले आहे. ही कुटुंबे अनेक दशकांपासून येथे राहात होती आणि चार महिन्यांपूर्वी राज्यात वांशिक संघर्ष उफाळल्यानंतरही येथून इतरत्र गेली नव्हती. ही कुटुंबे ‘असुरक्षित लक्ष्य’ बनलेली असल्याने त्यांना शनिवारी पहाटे इम्फाळ खोऱ्याच्या उत्तरेकडील कुकीबहुल कांग्पोक्पी येथे नेण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
या शेवटच्या दहा कुकी कुटुंबांना इम्फाळपासून सुमारे २५ किलोमीटरवर असलेल्या कांग्पोक्पी जिल्ह्यातील मोतबुंग येथे जाण्यासाठी ‘सुरक्षित मार्ग’ उपलब्ध करून देण्यात आला, असे हा अधिकारी म्हणाला, मात्र न्यू लंबुलेन भागातील आपल्या घरांतून आपल्याला बळजबरीने बाहेर काढून देण्यात आल्याचा आरोप या कुटुंबांनी केला. मणिपूरमध्ये ३ मे रोजी वांशिक संघर्ष सुरू झाल्यानंतर न्यू लंबुलेन भागात राहणारी सुमारे ३०० आदिवासी कुटुंबे पूर्वीच टप्प्याटप्प्याने या भागातून निघून गेली होती.
बळजबरीने घराबाहेर काढल्याचा आरोप
‘गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार काम करत असल्याचा दावा करणाऱ्या सशस्त्र गणवेशधारी जवानांचे एक पथक १ व २ सप्टेंबरच्या मध्यरात्री न्यू लंबुलेन, इम्फाळ येथे आले आणि त्यांनी कुकी वस्तीतील उर्वरित रहिवाशांना घरातून बाहेर काढले,’ असे कुकी वस्तीत पहारा देणाऱ्या एका स्वयंसेवकाने सांगितले.