उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मॅगी खाल्ल्यानंतर १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच कुटुंबातील इतर पाच सदस्यांना विषबाधा झाली असून त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सदस्यानींही मॅगी न खाल्ली होती, असे सांगितले जाते. या कुटुंबातील सदस्यांनी भातासह मॅगी खाल्ल्यानंतर त्यांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. द इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.
हजारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राहुल नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. दरम्यान कुटुंबातील सदस्यांची प्रकृती खालावल्यामुळे सर्वांना पुरणपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. भातासह मॅगी खाणे हे ऐकायला जरा विचित्र वाटत असले, तरी अशी घटना घडली आहे. राहुल नगर येथे राहणाऱ्या मनिराज यांची मुलगी सीमा आपल्या तीन मुलांसह देहरादूनहून आपल्या माहेरी आली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी घरी जेवणासाठी मॅगी आणि भात केला होता. सीमा आणि तिच्या तीन मुलांव्यतिरिक्त त्यांची बहीण, भाऊ आणि त्याच्या पत्नीनेही मॅगी-भात खाल्ला.
गुरुवारी (दि.९ मे) मॅगी – भात खाल्ल्यानंतर त्याच रात्री घरातील सहा सदस्यांची प्रकृती बिघडली. शुक्रवारी सकाळी सर्वांना गावातील उपचार केंद्रात दाखल केले गेले. मात्र प्रकृतीत सुधार न झाल्यामुळे पुन्हा सर्वांना घरी पाठविण्यात आले. मात्र शुक्रवारी रात्री पुन्हा सर्वांची प्रकृती आणखी बिघडली आणि शनिवारी (दि. ११ मे ) सकाळी दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका खासगी रुग्णालयात सदर पीडित कुटुंबियांवर उपचार केल्याचे दिसत आहे.
विश्लेषण: अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा शोर्मा भारतात कुठून आला?
या घटनेची माहिती इंटरनेटवर पसरताच लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोशल मीडियावर अनेक लोक फास्ट फूड किंवा जंक फूडची निवड करताना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. पिलीभीतमध्ये या घटनेची बातमी पसरल्यानंतर अनेकांनी खासगी रुग्णालयात धाव घेत, सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.