Bengaluru Molested Case : देशातील विविध राज्यात महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला सुरक्षेकरता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असली तरीही मोठ्या शहरातील लहान गल्ल्यांमध्येही महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. परंतु, मोठ्या शहरांत अशा घटना घडतचाच अशी असंवेदनशील प्रतिक्रिया कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे. बंगुळूरूतील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
बंगळुरूतील सुद्दागुंटेपल्या येथील भारती लेआउट येथे एका मुलाने एका मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. भररस्त्यात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला अन् तिथून तो पळून गेला. परंतु, सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभर या व्हिडिओची चर्चा झाली. त्यामुळे कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
“अशा मोठ्या शहरात अशा घटना घडतच राहतात. जी काही कायदेशीर कारवाई करायची असेल ती कायद्यानुसारच केली जाईल. मी आमच्या आयुक्तांना बीट पेट्रोलिंग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत”, असं जी परमेश्वरा म्हणाले.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसतंय?
बेंगळुरूच्या एका निर्जन रस्त्यावरून दोन मुली जात होत्या. तेवढ्यात मागून एक मुलगा आला आणि त्याने एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटना घडल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आहे. कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. पीडितेने कोणतीही तक्रार दाखल केलेली नसली तरी, पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेतला आहे. कलम ३५४ ब (महिलेचे कपडे उतरवण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगळुरूच्या रस्त्यावर दोन मुलींची छेड काढण्यात आली pic.twitter.com/k4cB8bDXmr
— Viral Content (@ViralConte97098) April 6, 2025
भारताच्या आयटी राजधानीत महिला सुरक्षा वाऱ्यावर?
३ एप्रिल रोजी बंगळुरूतील बीटीएम लेआउटमधील सुद्दागुंटे पल्या येथील एका निर्जन रस्त्यावर हा प्रकार घडला. पोलीस गुन्हेगार आणि पीडित दोघांचीही ओळख पटवण्याचे काम करत आहेत, व्यक्तींची ओळख पटल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहेत. भारताच्या आयटी राजधानीत महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण होत आहे. वारंवार असे प्रकार घडल्याने नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे.