हावडा : पश्चिम बंगालमधील हावडा शहरातील काजीपाडा भागात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचाराची घटना घडली होती. यानंतर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर शुक्रवारी काही व्यक्तींनी दगडफेक केली. यामुळे तणाव वाढला असून पोलिसांनी कलम १४४ लागू केले आहे.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. काजीपाडा परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. हिंसाचाराच्या गुरुवारच्या घटनेपासून आतापर्यंत ४४ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘‘शुक्रवार दुपापर्यंत परिसरात शांततापूर्ण तणाव होता. परंतु पोलिसांवर दगडफेकीची घटना घडल्यानंतर तणाव वाढला. पोलिसांनी या घटनेनंतर काही व्यक्तींना अटक केली.’’ असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांवर दगडफेकीची घटना घडल्यानंतर वाहनांची वर्दळ थांबली. लोकांनी घरात राहणे पसंत केले. दगडफेकीत किमान तीन पोलीस जखमी झाले. त्यापैकी एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक कृती दलाचे एक पथक शुक्रवारी दुपारी या भागात तैनात केले आहे. या अगोदर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हावडामधील घटनेला भाजप आणि डावे पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हावडामधील हिंसाचाराच्या घटनेबाबत राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांच्याबरोबर चर्चा करून माहिती घेतली.